पुणे - धायरी ते डीएसके विश्वला जोडणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या पथ विभागाने चार दिवसांपूर्वीच डांबरीकरण केले होते. मात्र, आज (ता. २८) खासगी ठेकेदाराने एका इमारतीला सांडपाणी वाहिनी जोडण्यासाठी बेकायदेशीरपणे हा रस्ता जेसीबीने खोदलाच, शिवाय जुनी सांडपाणी वाहिनी फोडून टाकली.
नागरिकांनी जाब विचारल्यानंतर हे काम बंद पाडण्यात आले. दरम्यान महापालिकेच्या पथ विभागाकडून संबंधित ठेकेदार, बिल्डर आणि हे काम करायला लावणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.
धायरी परिसरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे, या भागातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी प्रशासनाकडे कायम पाठपुरावा सुरु असतो. धायरी गावातून डीएसके विश्वकडे जाणाऱ्या रस्त्यावर चामुंडा हॉटेल ते डीएसके विश्व कमान या दरम्यानचा रस्ता चार दिवसांपूर्वी करण्यात आला.
आज सकाळी याठिकाणी जेबीसीने रस्ता खोदण्याचे काम सुरु केले. नागरिकांनी तेथील कामगारांकडे चौकशी केली असता भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या पीएचे काम आहे एवढेच सांगितले जात होते. नागरिकांना हे महापालिकेचे काम आहे असे वाटत असल्याने ‘आत्ताच रस्ता केलाय लगेच खोदला का?’ अशा शब्दात जाब विचारत होते.
या ठिकाणी महापालिकेच्या पथ, मलनिःसारण विभागाचे अभियंते उपस्थित नव्हते. दरम्यान ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने घटनास्थळावरून पथ विभागाचे उप अभियंता नरेश रायकर, मलनिःसारणचे निशिकांत छापेकर, शुभम देशमुख यांच्याकडे चौकशी केली असता रस्ता खोदण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.
तसेच किशोर पोकळे यांच्या पाठपुराव्याने झालेला आहे, त्यांना हा प्रकार कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन ठेकेदाराला जाब विचारला व काम बंद पाडले. हे काम महापालिकेसाठी नाही तर एका बांधकाम व्यावसायिकाच्या इमारतीला अनधिकृतपणे सांडपाणी वाहिनी जोडण्यासाठी सुरु होते.
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, नवीन रस्ता बेकायदेशीरपणे खोदल्याचे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित सर्वांवर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकाची तक्रार बांधकाम विभागाकडेही केली जाईल.
प्रचंड वाहतूक कोंडी
हॉटेल चामुंडा ते डीएसके विश्व कमान हा रस्ता आधीच अरुंद आहे, त्यातच भर गर्दीच्या वेळी बेकायदेशीरपणे रस्ता खोदून ठेवला. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.