राजस्थान रॉयल्सने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने केलेल्या ऐतिहासिक शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सवर 8 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं होत. राजस्थानने हे आव्हान वैभवच्या वादळी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. राजस्थानने 25 बॉलआधी आणि 2 विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पूर्ण केलं आणि एकतर्फी विजय मिळवला. राजस्थानने 15.5 ओव्हरमध्ये 212 धावा केल्या. वैभव व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल यानेही विजयात योगदान दिलं. यशस्वीने नाबाद 70 धावा केल्या. तर कर्णधार रियान परागही 32 धावावंर नाबाद परतला. राजस्थानचा हा सलग पाचव्या पराभवानंतर पहिला तर एकूण तिसरा विजय ठरला.
प्रेझेंटटेर मुरली कार्तिक यांनी राजस्थानच्या विजयानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान वैभवसह संवाद साधला. वैभवने या दरम्यान अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. तसंच त्याला या खेळीबाबत काय वाटलं? हे देखील वैभवने सांगितलं. “ही खूप चांगली भावना आहे. आयपीएल स्पर्धेतील हे माझं पहिले शतक आहे. ही माझी तिसरी इनिंग होती. स्पर्धेपूर्वी मी खूप सराव केला. त्या सरावाचा निकाल येथे दिसून आला आहे”, असं वैभवने म्हटलं.
तु इतक्या दिग्गज आणि अनुभवी गोलंदाजांसमोर खेळत होतास. त्यांच्यासमोर कसं खेळायचं? त्यांचा सामना कसा करायचा? याचं तुला दडपण नव्हतं का? असा प्रश्न कार्तिकने केला. यावर वैभवने म्हटलं की, “मी फक्त बॉल पाहत होतो आणि खेळत होतो.”
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी विजयी धावांचा पाठलाग करताना 166 धावांची सलामी भागीदारी केली. या जोडीने केलेल्या भागीदारीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. वैभवने शतकी खेळीबाबत बोलताना यशस्वी जयस्वाल याचाही उल्लेख केला. यशस्वी मला दुसऱ्या बाजूने मार्गदर्शन करत होता. मला त्याच्यासोबत बॅटिंग करायला आवडते”, असं म्हणत वैभवने त्याच्या या खेळीचं काही अंशी श्रेय यशस्वीला दिलं आणि मनाचा मोठेपणा दाखवून दिला.