मराठ्यांनी अटकेपार धडक मारत सध्याचा पाकिस्तान, बलुचिस्तान ते अफगाणिस्तान सीमेपर्यंत भगवा फडकवला होता. १७५८च्या मेहिमेत मराठ्यांच्या फौजा अटक, डेरा गाझी ते पेशावरपर्यंत गेल्या होत्या.
१७५८ च्या मोहिमेचं नेतृत्व रघुनाथराव पेशवे, मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, खंडुजी कदम, नेकाजी भोसले, साबाजी शिंदे यांनी केलं होतं. यात मराठ्यांनी काही प्रमुख किल्ले जिंकले होते.
सध्या पाकिस्तानातील लाहोरमध्ये असलेल्या शाही किल्ल्यावर पहिलं पाऊल टाकणारे वीर मानाजी पायगुडे होते. १० एप्रिल १७५८ ला शाही किल्ला जिंकला होता.
झेलम शहरातील १२ मोठे दरवाजे आणि ६० फूट उंचीचे ६८ बुरुज असलेला रोहतास किल्लाही मराठ्यांनी जिंकला होता. जहाँगीरने या किल्ल्याबद्दल म्हटलं होतं की, या किल्ल्याच्या ताकदीचा अंदाज कुणीही लावू शकत नाही.
अहमदशाह अब्दालीचा मुलगा तैमुरशाह दुर्राणी यानं पेशावर मधील किल्ल्याला बाला हिस्सार असं नाव दिलेलं. दुर्राणी साम्राज्याची हिवाळी राजधानी याठिकाणी होती. बाला हिस्सार अफगाणी नाव असून याचा अर्थ कललेला किल्ला असा होतो.
मुलतानचा कोहना किल्ला हा जवळपास १२०० वर्षे जुना आहे. २ किमी इतका घेर असलेल्या या किल्ल्याला ४६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत.
सध्याच्या पाकिस्तानात असलेला अटक किल्ला सिंधू नदीच्या काठावर आहे. मराठ्यांनी हा किल्ला १७५८ मध्ये जिंकला. या मोहिमेत मानाजी पायगुडे आघाडीवर होते.
खैबरखिंडीच्या पायथ्याला असलेला जमरूद किल्लाही मराठ्यांनी जिंकला होता. या मोहिमेचं नेतृत्व मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे, तुकोजी होळकर, केशवराव पानसे यांनी केलं होतं.