भारत आणि फ्रान्स यांच्यात नवीन राफेल करार
Marathi April 29, 2025 10:27 AM

भारतीय नौदलाकरिता मिळणार 26 अद्ययावत विमाने : 63 हजार कोटींचा व्यवहार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारत आणि फ्रान्स यांच्यात अत्याधुनिक राफेल विमानांसाठी नवा करार झाला आहे. या कराराच्या अंतर्गत भारत फ्रान्सकडून आपल्या नौदलासाठी 26 अद्ययावत आणि शस्त्रसज्ज युद्धविमाने घेणार आहे. हा करार एकंदर 63 हजार कोटी रुपयांचा आहे. हा दोन देशांच्या सरकारांमध्येच झालेला प्रत्यक्ष करार आहे.

फ्रान्सच्या देसाँ कंपनीकडून भारत ही विमाने खरेदी करणार आहे. याच कंपनीकडून भारताने वायुदलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी यापूर्वी केलेली आहे. नवी विमाने भारताच्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेवर नियुक्त केली जाणार आहेत. या विमानांमुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सागरतटांचे संरक्षण करण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.

22 विमाने एक आसनी

भारत विकत घेणार असणाऱ्या नव्या 26 राफेल विमानांपैकी 22 विमाने ही एकआसनी असतील. तर चार विमाने दोन आसनी असून ती प्रशिक्षण विमाने आहेत. ही विमाने ‘राफेल-एम’ या प्रकारची आहेत. या विमानांसह भारताला या विमानांवरचा शस्त्रसंभार, सिम्युलेटर्स, सुटे भाग, साहाय्यक इतर उपकरणे, विमान चालक प्रशिक्षण आणि भारतीय नौदलासाठी रसदपुरवठा अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाची संमती

या विमानांच्या खरेदीला केंद्रीय मंत्रिमंडळाने काही आठवड्यांपूर्वी संमती दिली होती. अशा अत्याधुनिक विमानांची मागणी भारतीय नौदलाकडून बऱ्याच वर्षांपासून केली जात आहे. नौदलाकडे स्वत:चे सुसज्ज वायुदल असल्याची आवश्यकता सांप्रतच्या काळात निर्माण झाली आहे. भारतीय नौदलासमोर आज केवळ पाकिस्तानचे नव्हे, तर चीनचेही आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताच्या सागरी क्षेत्राच्या संरक्षणासाठी नौदलाकडे विमाने असणे अपरिहार्य आहे. म्हणून हा करार करण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नव्या विमानांची वैशिष्ट्यो…

नवी राफेल विमाने अत्यंत मजबूत असून ती सागरी खाऱ्या हवामानातही कित्येक दशके टिकाव धरु शकतील अशी आहेत. सागरी हालचालींवर देखरेख आणि आक्रमण अशा दोन्ही उद्देशांसाठी ही विमाने उपयुक्त आहेत. या विमानांवरुन आकाशातून भूपृष्ठावर आणि आकाशातून आकाशात अशा दोन्ही प्रकारचा मारा करता येतो. भारताच्या नौदलाचे संरक्षण करणे आणि शत्रूच्या युद्धनौका, तसेच विमाने यांच्यावर हल्ला करणे, अशी दोन्ही कार्ये हे विमान करु शकते. त्याचा वेगही मोठा आहे. उतरणे किंवा उ•ाण करणे, या दोन्ही कृती हे विमान सहजगत्या, कमी वेळेत आणि कमी अंतरात करते. आधुनिक क्षेपणास्त्रांचा मारा या विमानांमधून करता येतो, अशी या विमानांची अनेक वैशिष्ट्यो आहेत.

केव्हा मिळणार

भारताला ही नवी राफेल विमाने 2031 पर्यंत मिळणार आहेत. 2028 पासून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहेत. भारताच्या वैमानिकांना ती चालविण्याचे प्रशिक्षण प्रथम फ्रान्समध्ये, तर नंतर भारतात दिले जाईल. त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या विमानांपैकी चार विमाने विशेषत्वाने प्रशिक्षणासाठी असतील. ही विमाने भारताला पुढची किमान 20 वर्षे सेवा देत राहतील, असे अनुमान आहे. विक्रांत या भारताच्या 40 हजार टनी विमानवाहू युद्धनौकेवरुन या विमानांची अंमलबजावणी योग्यप्रकारे आणि विनासायास करता येईल, अशाप्रकारे त्यांची रचना करण्यात आली आहे, अशीही माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

नौदलाचे सामर्ध्य वाढणार…

ड राफेल-एम विमानांच्या समावेशामुळे भारताच्या नौदलाचे सामर्थ्य वाढणार

ड सर्व विमानांचा पुरवठा भारताला टप्प्याटप्प्याने 2031 पर्यंत केला जाणार

ड विमानांसह क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक शस्त्रसंभार, सुटे भाग, प्रशिक्षण मिळणार

ड हा दोन देशांच्या सरकारांमधील प्रत्यक्ष करार, देसाँ कंपनीकडून मिळणार

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.