नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ युट्यूब चॅनेल्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात जिओ न्यूज, डॉन, रफ्तार, बोल न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, सुनो न्यूज या पाकमधील माध्यमांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर या चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे.
पाकमधील काही व्यक्ती, पत्रकार आणि काही युट्यूब हॅंडल्सवर बंदी घालण्यात आली आहे, यात मुनीब फारुख, उमर चीमा, असमा शिराजी आणि इर्शाद भट्टी, उझेर क्रिकेट, पाकिस्तानी रेफ्रन्स, राझी नामा आणि समा स्पोर्टस यांचा समावेश आहे. सर्व १६ युट्यूब चॅनेल्सच्या सबस्क्राइबरची संख्या ६३ दशलक्ष इतकी आहे. वरील चॅनेल्सकडून प्रक्षोभक आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित केली जात आहे. शिवाय भारत, भारतीय लष्कर आणि इतर तपास संस्थांना लक्ष्य करीत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
बीबीसीच्या वार्तांकनावर नाराजीदरम्यान, दहशतवाद्यांचा उल्लेख कट्टरतावादी असा करणाऱ्या ‘बीबीसी’ या माध्यम समूहाला पत्र लिहीत सरकारने तीव्र नापसंती कळवली आहे. ‘बीबीसी’कडून केल्या जात असलेल्या वार्तांकनावर परराष्ट्र खात्याच्या प्रसिद्धी विभागाने लक्ष ठेवले असल्याचे समजते.
शोएब अख्तरलाही दणकापाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याचा १०० एमपीएप या यूट्यूब चॅनेलवरही भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटपटू बासित अली, रशीद लतीफ यांच्या चॅनेलवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला.