पुणे शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता असणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे गुरुवारी ०१ मे रोजी उद्घाटन होणार आहे. त्यामुळे आता हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते पण फन टाईम थिएटरपर्यंतच्या २१०० मीटर लांबीच्या काम पूर्ण झालेले आहे. पण हा पूल नागरिकांसाठी खुला केला जात नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पुलाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण त्यांची तारीख मिळाली नव्हती.
फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, पण या काळातही हा उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी खुला होऊ शकला नव्हता. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाईल असा निरोप महापालिका प्रशासनाला राज्य शासनातर्फे देण्यात आलेला आहे. त्यानुसार हा कार्यक्रम ०१ मे रोजी पार पडणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
यापूर्वी अजितदादांच्या हस्तेच उद्घाटन -
राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन भाजप नेत्यांच्या हस्ते होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण त्यावेळी देखील भाजपच्या नेत्यांची वेळ न मिळाल्याने अखेर २६ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करून हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला होता. आता या प्रकल्पातील दुसऱ्या पुलाचेही उद्घाटन अजित पवार यांच्या हस्तेच होत आहे.