सध्या शहरांपासून गावांपर्यंत रस्त्यांवर इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे. महागड्या पेट्रोल-डिझेलपासून बचत आणि पर्यावरणपूरक प्रवास यामुळे बरेच लोक इलेक्ट्रिक कार आणि स्कूटर्सकडे आकर्षित होत आहेत. पण यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न पालक आणि तरुणांच्या मनात येतो, “१८ वर्षांखालील मुलं इलेक्ट्रिक कार चालवू शकतात का?”
कायदा काय सांगतो?
भारतात वाहन चालवण्यासंबंधी नियम Motor Vehicles Act, 1988 अंतर्गत ठरवले जातात. या कायद्यानुसार, कोणतीही चारचाकी गाडी चालवण्यासाठी चालकाचं वय किमान १८ वर्ष पूर्ण असणं आणि त्याच्याकडे वैध Driving License असणं गरजेचं आहे. गाडी इलेक्ट्रिक असो की पेट्रोल-डिझेलवर चालणारी, सर्वांसाठी नियम एकच लागू होतो.
१६ वर्षांनंतर कोणती गाडी चालवता येते?
१६ ते १८ वयोगटातील मुलांना केवळ विशिष्ट प्रकारच्या कमी पॉवरच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Scooter) चालवण्याची परवानगी आहे. परंतू, या सवलतीच्याही काही अटी आहेत:
1. स्कूटर गिअरलेस असावी.
2. तिची मोटर शक्ती १५०० वॉट्स पेक्षा कमी असावी.
3. स्कूटरचा वेग मर्यादित असावा.
या गाड्यांना Registration किंवा मोठ्या लायसन्सची गरज नसते, पण तरीही यासाठी ‘LL’ — Learning License आवश्यक आहे. त्यामुळे कार असो, बाईक असो, पॉवर जास्त असेल तर कायद्यात कोणतीही माफी नाही!
अल्पवयीन मुलगा गाडी चालवताना पकडल्यास काय होते?
जर एखाद्या १८ वर्षाखालील मुलाने कार, बाईक किंवा परवानगी नसलेली इलेक्ट्रिक गाडी चालवताना पकडले गेले, तर पालकांसाठी आणि गाडी मालकांसाठी ही मोठी अडचण ठरू शकते.
कायदेशीर कारवाई दंड काय असतो:
1. ₹२५,०००/- दंड भरावा लागतो.
2. गाडीची नोंदणी १ वर्षासाठी रद्द केली जाते.
3. अपघात झाला तर पालकांवरही केस दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
वय कायद्यानुसार ठरलेलं आहे आणि कोणतीही इलेक्ट्रिक कार चालवण्यासाठी किमान १८ वर्ष पूर्ण वय आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे. गैरसमजात न राहता कायद्याची योग्य माहिती असणे फायद्याचे ठरेल!