माजी फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता फक्त आयपीएल स्पर्धेत खेळत आहे. आर अश्विन सध्या चेन्नई सुपर किंग्स संघात असून स्थिती नाजूक आहे. चेन्नई सुपर किंग्स संघ गुणतालिकेत तळाशी आहे आणि एक पराभवानंतर स्पर्धेतून आऊट होणार आहे. पण काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका संघात असताना आर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतली होती. मालिकेदरम्यान त्याने असं पाऊल उचलल्याने अनेकांना धक्का बसला होता. कसोटी मालिकेतील सामने शिल्लक असताना मायदेशी परतला होता. आता आर अश्विनने याबाबत खुलासा करताना सांगितलं की, निवृत्तीबाबत डोक्यात दोन वेळा विचार आला होता. एकदा 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आणि एक वर्षानंतर भारताने इंग्लंडला हरवलं तेव्हा… आर अश्विनने फ्रेंचायझीचं पॉडकास्ट शो माइक टेस्टिंग 123 वर माइक हसीशी बोलताना निवृत्तीबाबत सांगितलं.
आर अश्विनने सांगितलं की, ‘प्रामाणिकपणे सांगतो की मी हा निर्णय 100व्या कसोटीनंतर घेणार होतो. त्यानंतर होम सीरिजमध्ये असं करण्याचा विचार आला. तुम्ही चांगलं खेलता आणि विकेट मिळत असतील तर मला वाटलं की काही वेळ आणखी खेळणं समजूतदारपणाचं ठरेल.मला खूप मजा येत होती पण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मैदानावर परत येण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवणे.’
आर अश्विनने पुढे सांगितलं की, मला वाटले की मी कदाचित चेन्नई कसोटीने माझे करिअर संपवीन. मी सहा विकेट्स घेतल्या आणि शतकही केले. म्हणून जेव्हा तुम्ही खूप चांगले प्रदर्शन करत असता तेव्हा खेळ सोडणे खूप कठीण असते. म्हणून मी मालिका सुरू ठेवली आणि आम्ही न्यूझीलंडकडून हरलो. तर एकामागून एक सगळं वाढत गेलं आणि मग मला वाटलं की ठीक आहे मी ऑस्ट्रेलियाला जायला हवं. बघूया कसं होतंय कारण मागच्या वेळी मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा माझा दौरा खूप छान झाला होता. पण यावेळी तसं झालं नाही आणि मग मला वाटलं की क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आली आहे.’