DC vs KKR: Battle for Playoff Survival in IPL 2025 Match 48 : दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आज आयपीएल साखळी फेरीचा सामना होणार आहे. याप्रसंगी दिल्लीचा संघ सातव्या विजयासाठी, तर कोलकाता संघ चौथ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल. दिल्लीच्या संघाचे लक्ष्य मधल्या फळीतील फलंदाजी सुधारण्याचे असणार आहे. कोलकाता संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी विजय आवश्यक आहे.
दिल्ली संघाने पहिल्या चारही लढतींमध्ये विजय मिळवत शानदार सुरुवात केली. त्यानंतर मात्र पाचपैकी तीन लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. युवा अभिषेक पोरेल सलामीला आक्रमक फलंदाजी करीत आहे. फाफ ड्युप्लेसी याने दुखापतीवर मात करीत पुनरागमन केले खरे; पण नवी दिल्ली स्टेडियममधील संथ खेळपट्टीवर त्याला चमक दाखवता आली नाही.
करुण नायरने आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सुरुवात शानदार केली; पण त्यानंतर त्याला सुमार फॉर्ममधून जावे लागत आहे. के. एल. राहुल दिल्लीच्या फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. त्याच्यावरच त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. ट्रिस्टन स्टब्स व आशुतोष शर्मा यांनीही चमक दाखवायला हवी.
दिल्लीच्या संघाचा गोलंदाजी विभागही छान कामगिरी करीत आहे. मिचेल स्टार्क याच्याकडे लढतीला कलाटणी देण्याची क्षमता आहे. मुकेशकुमार, दुशमंता चमीरा यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव यांच्याकडून प्रभावी कामगिरी होत आहे. दिल्लीच्या गोलंदाजांना कोलकाता संघातील फलंदाजांना रोखावे लागणार आहे.
फलंदाजांकडून आशाकोलकाता संघाची फलंदाजीची मदार कर्णधार अजिंक्य रहाणेवर आहे. रहाणेसह अंगक्रीश रघुवंशी समाधानकारक खेळ करीत आहेत. रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांच्याकडून यंदाच्या मोसमात अद्याप मोठी कामगिरी झालेली नाही. कोलकाता संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी यापुढील प्रत्येक लढतीमध्ये विजय आवश्यक आहे. त्यामुळे निष्काळजी खेळ करून चालणार नाही.
वरुण, नारायणकडून अपेक्षाकोलकाता संघातील गोलंदाजांनीही अद्याप सांघिक कामगिरीत यश मिळवलेले नाही. वरुण चक्रवती, सुनील नारायण, हर्षित राणा व वैभव अरोरा या गोलंदाजांना सांघिक कामगिरीत यश मिळवायला हवे. तसेच त्यांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. कोलकाता संघाला दिल्ली संघाला त्यांच्याच घरच्या स्टेडियमवर पराभूत करण्यासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे.