Crime News : घरफोडीसाठी भयानक प्लॅन; पोलिसही चक्रावले, नेपाळी टोळी ताब्यात
Saam TV April 29, 2025 06:45 PM

पिंपरी चिंचवड : घरफोडी करणारी टोळी सक्रिय होत रात्रीच्या सुमारास घरात घुसून चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा प्लॅन आखून चोरी केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घरातील मंडळींना गुंगीचे औषध देऊन लोकांच्या घरात चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेपाळी टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शहरात मागील काही दिवसांपासून हि टोळी सक्रिय झाली होती. घरकामासाठी बाईची आवश्यकता असलेल्या घराची टेहळणी या टोळीकडून केली जात होती. यानंतर तेथे जाऊन घरकामासाठी मोलकरीण म्हणून कामाला लागायचे. अर्थात एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जाऊन त्यांचा विश्वास संपादन करून घर कामासाठी कामाला लागायचे. या दरम्यान आपल्या साथीदारांसोबत चा प्लॅन आखला जायचा. 

गुंगीचे औषध देऊन करायचे चोरी 

घरात काम करायला काही दिवस झाल्यानंतर घरातील मंडळींना जेवणातून किंवा एखाद्या पेयातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्याचे काम केले जात होते. यानंतर आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी करण्याची पद्धत या टोळीने अवलंबली होती. घरफोडीचा गुन्हा केल्यानंतर ही टोळी नेपाळला विमानाने पसार होत होती. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी आपल्या देशात येऊन पुन्हा घरफोडी करत होते.

तिघेजण पोलिसांच्या ताब्यात 

तपासात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी टोळीतील कमल बहादूर नारायण शाही, नवीन बहाद्दूर रुद्र बहादूर शाही (वय २४) आणि नर-बहादुर दिप बहादुर शाही (वय ३८) या तिन जणांना निगडी पोलिसांनी बेंगलोर विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी मिळून त्यांच्या साथीदारच्या मदतीने कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात चार घरफोडी केल्याचे गुन्हे निगडी पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.