Hydroelectricity Project : अपारंपरिक ऊर्जेसाठी सरकार सरसावले! नऊ हजार मेगावॉटचे उभारणार जलविद्युत प्रकल्प
esakal April 30, 2025 06:45 AM

मुंबई - राज्याची अपारंपरिक म्हणजे हरित ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यानुसार मंगळवारी उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी जलसंपदा विभाग, महानिर्मिती, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड आणि अवादा अॅक्वा बॅटरीज लिमिटेड या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले.

त्यामुळे राज्यात तब्बल ५७ हजार २६० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यामाध्यमातून ८ हजार ९०५ मेगावॉट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. या प्रकल्पातून ९ हजार २०० रोजगार निर्मिती होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे सामंजस्य करार केले गेले. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव सुजाता सौनिकआदी मान्यवर उपस्थित होते.

या करारानुसार महानिर्मिती ३,१४५ मेगावॉट, महाजनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड २,११० मेगावॉट तर अवादा अॅक्वा बॅटरीज लिमिटेड ३,६५० मेगावॉटचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारेल.

येथे होणार प्रकल्प

  • महानिर्मितीमार्फत घाटघर येथे १२५ मेगावॉट, कोडाळी येथे २२० मेगावॉट, वरसगाव येथे १,२०० मेगावॉट आणि पानशेत येथे १,६०० मेगावॉटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत

  • महाजनको रिन्युएबल एनर्जी लिमिटेड यांच्यामार्फत मुतखेड येथे ११० मेगावॉट, निवे येथे १२०० मेगावॉट आणि वरंढघाट येथे ८०० मेगावॉटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

  • अवादा अॅक्वा बॅटरीज लि. यांच्यामार्फत पवना येथे २,४०० मेगावॉट, सिरसाळा येथे १,२५० मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.