कोथरुड - संध्याकाळी सहाच्या सुमारास चांदणीचौकाच्या उतारावरुन कोथरुड डेपोकडे वेगाने निघालेल्या पीएमटी बसने रस्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला व पाच दुचाकी वाहनांना, व रस्त्यावर उभ्या असलेल्या नागरिकांना धडक देवून हॉटेल खानदेशपाशी थांबली. सुदैवाने या घटनेत जिवीत हानी झाली नाही. जीवावर बेतले होते पण ते पायावर निभावले अशी भावना जखमींनी व्यक्त केली.
योगेश सोपान केमसे, (वय-४६), रा. रावेत हे गाडीत हवा भरायला उभे होते तर प्रणव अरुण साळवे, (वय-२८), रा. दौंड हा वनाज मेट्रो स्थानकाकडे पायी निघाला होता. काही कळायच्या आतच बसने त्यांना उडवले. या दोघांच्याही पायाचे हाड मोडले आहे. राजेंद्र वसंत नलावडे, रा. गुलटेकडी यांच्या रिक्षाचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या बोटांना दुखापत झाली आहे. इतर चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
प्रशांत कनोजिया, गणेश वरपे, सुभाष आमले व प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळील दवाखान्यात नेले.
प्रशांत कनोजिया म्हणाले, उंबराचे झाड असल्यामुळे टपरी वाला बचावला. अन्यथा त्याच्याही जीवावर बेतले होते.
पीएमपीएलच्या नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग बंद करा, असा संताप गणेश वरपे, सुभाष आमले यांनी व्यक्त केला.
कोथरुड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक संदीप देशमाने म्हणाले की, या अपघातात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. जखमींना रुग्णालयात हलवले असून अधिक तपास सुरु आहे.