कुटुंबीयांनी राष्ट्रीय अभिलेखागाराला सोपविले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे खासगी दस्तऐवज जतन केले जाणार आहेत. कुटुंबीयांनी अब्दुल कलाम यांचा पासपोर्ट, आधारकार्ड, पॅनकार्ड, पत्र व्यवहार आणि विविध संस्थांमध्ये दिलेल्या व्याख्यानाशी संबंधित वैयक्तिक कागदपत्रांना भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराला सोपविले आहे. यात अनेक छायाचित्रे देखील सामील आहेत.
भारताचे मिसाइल मॅन संबोधिले जाणारे एपीजे अब्दुल कलाम हे महान वैज्ञानिक होते. 2007-07 पर्यंत ते भारताचे 11 वे राष्ट्रपती राहिले. भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराने (एनएआय) कलाम यांची वैयक्तिक कागदपत्रे प्राप्त केलीआहेत. यात मूळ पत्रं, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, प्रवास अहवाल आणि विविध विद्यापीठे तसेच संघटनांमध्ये त्यांनी दिलेली व्याख्यानं सामील असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे दस्तऐवज माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची पुतणी एपीजेएम नाजेमा मरैकयार आणि माजी राष्ट्रपतींचे नातलग एपीजेएमजे शेख सलीम यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराला सोपविले आहेत. एनएआयचे महासंचालक अरुण सिंघल यांनी एका सोहळ्यात दस्तऐवज प्राप्त केल्यावर मरैकयार यांच्यासोबत एका करारावर स्वाक्षरी केली.
15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेले कलाम यांनी कठोर मेहनत आणि दृढसंकल्पाच्या बळावर मोठी झेप घेतली. भौतिकशास्त्र आणि एअरोस्पेस इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यावर कलाम यांनी भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले अणि 1998 च्या पोखरण आण्विक चाचण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असे उद्गार एनएआयने काढले आहेत.
कलाम हे भारताच्या युवांना प्रेरित करणारे महान वैज्ञानिक होते. कलाम यांनी विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स आणि इंडिया 2020 यासारख्या अनेक पुस्तकांचे लेखन केले होते. त्यांचे जीवन साधेपणा, दृढता आणि दूरदर्शी नेतृत्वाचे प्रतीक होते असे एनएआयने म्हटले आहे.
अभिलेखांचे जतन
एनएआय भारत सरकारच्या बिगर-वर्तमान अभिलेखांचा संरक्षक आहे. संशोधकांच्या वापरासाठी अभिलेखांना ट्रस्टमध्ये ठेवण्याचे काम एनएआय करते. सार्वजनिक अभिलेखांच्या विशाल संग्रहाबरोबर एनएआयमध्ये सर्व क्षेत्रांच्या प्रतिष्ठित भारतीयांच्या वैयक्तिक कागदपत्रांचा समृद्ध संग्रह देखील आहे.