शाश्वत विकास आणि पर्यावरण विज्ञान
esakal April 30, 2025 01:45 PM

- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स

आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकास ही जागतिक पातळीवरील सर्वांत मोठी गरज आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, पर्यावरणीय समस्या सोडवणे आणि टिकाऊ विकास साधणे यासाठी विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी निर्माण होत आहेत. शाश्वत विकास आणि पर्यावरण विज्ञान यामध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

पर्यावरण तज्ज्ञ

पर्यावरण तज्ज्ञ हे नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, आणि पर्यावरणीय समस्या सोडविण्याचे काम करतात. संशोधन, डाटा विश्लेषण आणि धोरणे विकसित करणे हे या क्षेत्राचे मुख्य कार्य आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापक

संपत्तीचा टिकाऊ वापर कसा करावा, यावर लक्ष केंद्रित करणारे नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापक हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. यामध्ये वनसंपत्ती, जलसंपत्ती, आणि खनिज संसाधनांचा समावेश आहे. हल्लीच्या काळात शेती करताना ज्या प्रकारे रासायनिक खतांचा वापर होत आहे, त्यामुळे माती संवर्धन हा विषय खूप महत्त्वाचा होत आहे.

नवउर्जास्रोत अभियंता

सौरऊर्जा, पवनऊर्जा, आणि जैवइंधन यांसारख्या नवऊर्जास्रोतांवर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवऊर्जास्रोत अभियंता महत्त्वाचे योगदान देतात. हे क्षेत्र पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देतो. सरकारी प्रोत्साहन आणि अनुदान यामुळे कारखान्यात आणि घरोघरी सौरऊर्जेचा वापर वाढला आहे.

शाश्वत वास्तुविद

शाश्वत वास्तुविद टिकाऊ आणि पर्यावरण पूरक इमारती डिझाइन करतात. इमारतीचे वीज, पाणी, आणि ऊर्जेचा वापर कसा कमी करता येईल, यावर त्यांचे लक्ष केंद्रित असते. वीजेचे ऑडिट करून घेऊन ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

जलतज्ज्ञ

पाण्याचा पुरवठा, गुणवत्ता, आणि संवर्धन यावर काम करणारे जलतज्ज्ञ जलव्यवस्थापनाच्या प्रकल्पांसाठी महत्त्वाचे असतात. जलसंपत्तीचा शाश्वत विकास हा त्यांच्या कामाचा गाभा आहे. शहरात नक्कीच पण ग्रामीण भागात सुद्धा पाण्याची टंचाई वाढू लागली आहे आणि भूजल पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

शाश्वत विकास सल्लागार

कंपन्या, संस्था किंवा सरकारी प्रकल्पांसाठी टिकाऊ धोरणे तयार करणारे सल्लागार ही भूमिका महत्त्वाची आहे. सध्या मोठ्या कंपन्यांमध्ये ‘ईएसजी’ हा विषय मूळ धरू लागत आहे. या क्षेत्राला महत्त्व प्राप्त होऊ पाहत आहे.

निष्कर्ष

शाश्वत विकास आणि पर्यावरण विज्ञान हे क्षेत्र केवळ करिअरच नव्हे तर समाजाच्या टिकाऊ भविष्यासाठी एक जबाबदारीही आहे. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रांमध्ये करिअर निवडून पर्यावरण संवर्धनात आपला वाटा उचलावा. शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाका आणि भविष्यातील पिढ्यांसाठी एक हरित भविष्य निर्माण करा!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.