आयसर, नायसर व आयएसीएस : विज्ञानप्रेमींसाठी संधी
esakal April 30, 2025 01:45 PM

भारतातील विज्ञान व संशोधन क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या तीन प्रमुख संस्था म्हणजे आयसर (IISER), नायसर (NISER) व आयएसीएस (IACS). ‘आयसर’ ही संस्था विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या आधिपत्याखाली असून पुणे, कोलकाता, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, बेरहामपूर व तिरुपती येथे तिच्या शाखा आहेत. ‘नायसर’ ही अणु ऊर्जा विभागाच्या आधिपत्याखाली भुवनेश्वर येथे कार्यरत आहे. तर ‘आयएसीएस’ संस्था कोलकाता येथे आहे.

‘आयसर’मध्ये उपलब्ध अभ्यासक्रम

‘आयसर’मध्ये बारावीनंतर मुख्यत्वे पाच वर्षांचा इंटिग्रेटेड बीएस-एमएस कार्यक्रम शिकवला जातो. तिसऱ्या वर्षापासून विद्यार्थ्यांना आवडती शाखा निवडता येते. याशिवाय काही ‘आयसर’मध्ये पीएचडी आणि इंटिग्रेटेड पीएचडी कार्यक्रमही उपलब्ध आहेत. बायोलॉजिकल, केमिकल, मॅथेमॅटिकल, फिजिकल सायन्स, इंजिनिअरिंग सायन्सेस बीटेक (केमिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, डेटा सायन्स) आदि शाखांमध्ये हे शिक्षण घेता येते. ‘आयसर भोपाळ’मध्ये बीटेक कोर्सेस, तिरुपतीमध्ये इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिकल सायन्सेस, कोलकातामध्ये बीएस एमएस कॉम्प्युटर सायन्स असे पर्याय उपलब्ध आहेत.

परीक्षा पद्धत व स्पर्धा

आयसरमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुख्य एकच मार्ग आहे, तो म्हणजे आयसर अॅप्टिट्यूड टेस्टच्या (आयएटी) द्वारे. पूर्वीचे जेईई अॅडव्हान्स व केव्हीपीवाय हे मार्ग आता उपलब्ध नाहीत. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या चारही विषयांवर आधारित प्रश्न असतात. परीक्षेत बहुविकल्पीय प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग लागू असते.

राष्ट्रीय पातळीवरील जागा उपलब्धता

संपूर्ण भारतभरातून ३५ ते ५० हजार विद्यार्थी ‘आयसर’साठी अर्ज करतात. यावर्षी एकूण मिळून साधारणतः २३६३ जागा उपलब्ध आहेत.

आयसर कट-ऑफ

दरवर्षी कट-ऑफ वेगवेगळे असतात आणि ते अर्जदारांच्या संख्येनुसार व त्यांच्या कामगिरीनुसार ठरतात. सरासरी कट-ऑफ गुण हे १०५ ते १२५ दरम्यान राहतात. परंतु प्रवेशासाठी केव्हाही अधिक गुण मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरते.

नायसर : विज्ञान अभ्यासासाठी एक उत्कृष्ट संस्था

राष्ट्रीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (नायसर) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, अर्थशास्त्र आणि संगणकशास्त्र यासारख्या विविध शाखांमध्ये शिक्षण दिले जाते. येथे ‘इंटरडिसिप्लिनरी’ अभ्यासक्रमाचा अवलंब केला आहे, त्यामुळे विद्यार्थी विविध शाखांमधील ज्ञान एकत्रितपणे प्राप्त करू शकतात.

INSPIRE व DAE STOAR सारख्या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते. NEST ही नायसर मध्ये प्रवेशासाठीची परीक्षा असून, ती IAT पेक्षा अधिक विश्लेषणात्मक आणि आव्हानात्मक मानली जाते.

इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (IACS)

५ वर्षांचा एकत्रित पदवी व पदव्युत्तर विज्ञान अभ्यासक्रम कोलकत्ता येथे आहे. शास्त्र व संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी IACS संस्थेने संशोधनावर आधारित, आंतरविषयीय ५ वर्षांचा एकत्रित विज्ञान अभ्यासक्रम सुरू केला आहे. पदवी स्तरापासूनच प्रगत वैज्ञानिक ज्ञान मिळवण्यासाठी ‘यूपीएसटी’ प्रवेश परीक्षेतून संधी मिळते.

निष्कर्ष

आयसर, नायसर आणि आयएसीएस या संस्था संशोधनात रुची असलेल्या विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी उपलब्ध करून देतात. अधिक माहितीसाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.