उरण, ता. ३० (वार्ताहर) : उरण तालुक्याच्या पाणथळ भागात दुर्मिळ समजले जाणारा लाल मानेचा फलारोप (रेड नेक्ड फलारोप) आणि ठिपक्यांचा टिलवा (स्पॉटेड रेडशँक) या पक्षाचे दर्शन झाले आहे. वन्यजीव अभ्यासक व पक्षिनिरीक्षक निकेतन ठाकूर यांना २८ एप्रिलला बेलपाडा येथील पाणथळींमध्ये हे पक्षी निदर्शनास आल्याने या भागाचे जैवविविधतेतील अनमोल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पक्षी अभ्यासक निकेतन ठाकूर हे त्यांचे सहकारी हेमंत वारे आणि दिलीप कदम यांच्यासोबत उरणमधील बेलपाडा व सावरखार येथे मंगळवारी (ता. २९) निरीक्षणास गेले होते. त्या वेळी त्यांना एक लाल मानेचा फलारोप व ठिपक्यांचा टिलवा हे दुर्मिळ पक्षी निदर्शनास आले. त्यांनी त्याची नोंद ई-बर्ड ह्या जागतिक पक्षिनिरीक्षण नोंदीच्या संकेतस्थळावर केली आहे. लाल मानेचा फलारोप व ठिपक्यांचा टिलवा हे दोन्ही स्थलांतरित पक्षी असून, विशेषतः त्यांच्या परतीच्या स्थलांतर मार्गात त्यांचे दर्शन दुर्मिळ मानले जाते, अशी माहिती ज्येष्ठ पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली. त्यामुळेच उरणच्या पाणथळ जागांचे महत्त्व जागतिक पातळीवर अधोरेखित झाले आहे.
----------------
स्थानिक मच्छीमारांना रोजगार मिळेल
उरण परिसरातील दलदली, खारफुटी आणि उथळ जलक्षेत्रे स्थलांतरित व देशी पक्ष्यांसाठी अत्यंत आवश्यक अधिवास म्हणून ओळखली जातात. तसेच पावसाळ्यात व भरती-ओहोटी क्षेत्रातील पाणी निचरा होण्याकरिता हे धारण तलाव उपलब्ध असणे आवश्यक आहे, तसेच त्या धारण तलावात स्थानिक मच्छीमार लोकांना मासळी पकडून त्यांचा उदरनिर्वाह करता येईल व निसर्ग पर्यटनास जर चालना मिळाली तर स्थानिकांना योग्य रोजगारही प्राप्त होईल.
-----------------------
संकटग्रस्त पक्ष्यांना आश्रय
उरणची पाणथळ जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असून, ती अनेक दुर्मिळ व संकटग्रस्त पक्ष्यांना आश्रय देत आहे. अशा ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे मत प्राणिमित्रांचे आहे. या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदीमुळे उरणच्या पाणथळी क्षेत्राला अधिक संवेदनशील आणि संरक्षित घोषित करण्याच्या मागण्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.