IPL Chennai Super Kings vs Punjab Kings Marahi Cricket News : चेन्नई सुपर किंग्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. दहा सामन्यांत आठवा पराभव पत्करल्यामुळे ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आणि पंजाब किंग्सने विजय मिळवून १३ गुणांसह तालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. युझवेंद्र चहलची हॅटट्रिक, सॅम करन, प्रभसिमरन सिंग व श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने हा सामना गाजला, परंतु एका गोष्टीची चर्चा अधिक रंगली. डेवॉल्ड ब्रेव्हिसने १८व्या षटकात शशांक सिंग याचा घेतलेला अविश्वसनीय झेल...
युझीने १९व्या षटकात हॅटट्रिकसह चार विकेट्स घेऊन चेन्नईला बॅकफूटवर फेकले. चेन्नईचा संघ ४ बाद १६४ वरून १९० धावांवर ऑल आऊट झाला. शेवटच्या २.२ षटकांत चेन्नईने २६ धावांत ६ विकेट्स गमावल्या. सॅम करन व डेवॉल्ड ब्रेव्हिस ( ३२) यांनी ७८ धावांची भागीदारी केली. करनने ४७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. पण, त्यांना अपेक्षित साथ न मिळाल्याने चेन्नईला दोनशे धावा पार करता आल्या नाही.
प्रत्युत्तरात प्रियांश आर्य ( २३) व प्रभसिमरन सिंग यांनी ४४ धावांची भागीदारी केली. प्रभसिमरन ( ५४) व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी ५० चेंडूंत ७२ धावा जोडल्या. श्रेयसने ४१ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७२ धावांची खेळी केली. शशांक सिंगने १२ चेंडूंत २३ धावा कुटल्या. पंजाबने १९.४ षटकांत ६ बाद १९४ धावा करून मॅच जिंकली.
शशांकने १८व्या षटकात रवींद्र जडेजाचे स्वागत चौकार-षटकाराने केले, पंरतु तिसऱ्या चेंडूवर डेवॉल्ड ब्रेव्हिसने सीमारेषेवर अविश्वसनीय झेल घेतला. शशांक १२ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. हा झेल यंदाच्या आयपीएलमधील सर्वोत्तम असल्याची चर्चा रंगली आहे.