हाफिज सईदला भारताची प्रचंड धास्ती, घराबाहेर पाक आर्मी, 4 किमीपर्यंत CCTV, चार लेअरची सिक्योरिटी
GH News May 01, 2025 11:07 AM

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद याने भारताच्या हल्ल्याची मोठी धास्ती घेतली आहे. पाकिस्तान सरकारने त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. पाकिस्तानने चार लेअरची सुरक्षा त्याला दिली आहे. हाफिज सईद याला पाकिस्तान सरकारने लाहोरमधील एका गुप्त ठिकाणी ठेवले आहे.

गुप्तचर संस्थाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील जोहर टाऊनजवळ असलेल्या 116 क्रमांकाच्या घरात हाफिज सईद याला ठेवण्यात आले आहे. त्याला ठेवण्यात आलेल्या ठिकाणी पाकिस्ताने चार स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. त्याच्या घराच्या चारही बाजूने पाकिस्तान लष्कराचे जवान आहेत. त्याच्या ठिकाणापासून चार किलोमीटरपर्यंत रस्त्यावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भारत कारवाई करणार आहे. भारत हाफिज सईदला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कर, आयएसआय आणि लष्कराकडून हाफिज सईद याला एक्स्ट्रा सुरक्षा दिली आहे. त्याच्या जवळचे लोक आणि त्याच्या नातेवाईकांना विशेष सुरक्षा दिली आहे. त्याने कुठेही जाऊ नये? असे पाकिस्तान लष्कराने त्याला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

हाफिज हा लाहोरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी राहत असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. उपग्रहाकडून मिळालेल्या छायाचित्र आणि व्हिडिओमधून हाफिज सईद याच्या लाहोरमधील घराची पुष्टी करण्यात आली होती. त्यावेळी हाफिज सईद याची सुरक्षा तीन स्तरीय होती. ती आता चार स्तरीय करण्यात आली आहे. २४ तास त्याच्या घराभवती पहारा आहे.

लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक असलेला हाफिज सईद हा 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाइंड आहे. संयुक्त राष्ट्र संघाने त्याला जागतिक दहशतवादी घोषित केले आहे. भारतासाठी तो सर्वात धोकादायक आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद त्याच्या पाठिंब्यामुळेच सुरु आहे.

मागील महिन्यात हाफिज सईद याचा जवळचा सहकारी अबू कताल याची हत्या झाली होती. त्यानंतर पाकिस्तान सरकारने त्याची सुरक्षा वाढवली होती. आता भारताकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुन्हा त्याच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. त्याचे घर एखाद्या कारागृहाप्रमाणे करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.