Maharashtra Live Update : चौंडीत मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या तयारीला वेग
Sarkarnama May 01, 2025 10:45 PM
चौंडीत मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या तयारीला वेग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुढील महिनाभर चौंडीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच 6 मे रोजी राज्या मंत्रिमंडळाची बैठकही होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी तीन हेलिपॅड, वातानुकुलित कक्ष आणि इतर सुविधांची तयारी वेगाने सुरू आहे.

खासदार ओमराजे अन् आमदार राणा पाटील यांच्यात पुन्हा वाद

जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेली स्थगिती अन तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून गुरुवारी पार पडलेल्या डीपीडीसी बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोरच राडा झाला. या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्यातील वाद चांगलाच रंगला. त्यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते.

जिल्हाध्यक्षांच्या घोषणेसाठी भाजपने काढला मुहूर्त : एकाच दिवशी 78 जणांना खुर्चीत बसवणार!

भाजपच्या संघटनात्मक निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यात मंडळ अध्यक्षांच्या निवडीनंतर 78 जिल्हाध्यक्षांची निवडणूक होत आहे. याचा अंतिम टप्पाही पार पडला आहे. पुढील आठ दिवसांत महाराष्ट्रात एकाचवेळी भाजपच्या 78 जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत.

Maharashtra News LIVE Updates : फडणवीसांच्या प्रगती पुस्तकात 'हा' विभाग नापास

राज्यात महायुती सरकार आले असून 100 दिवसांचा टप्पाही झाला आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 48 विभागांना 100 दिवसांचा धोरणात्मक कार्यक्रम दिला होता. ज्याचं प्रगती पुस्तक आज समोर आले आहे. यावेळी 12 विभांगाना 100 टक्के गुण मिळाले असून 24 टक्के गुण घेऊन सामान्य प्रशासन (सेवा) विभाग नापास झाला आहे.

Aditi Tatkare News : अंगणवाडी सेविकांचं मानधन रखडलेलं नाही : अदिती तटकरे

अंगणवाडी सेविकांचं मानधन रखडलेलं नाही. दरमहिना त्यांना वेळोवेळी मानधन दिले जाते, असे स्पष्टीकरण महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिलं आहे. एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करताना काही दिवसांचा विलंब होत असतो. त्यामुळे त्यांना मानधन देण्यास उशीर झाल्याचं तटकरेंनी आता स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे.

Pahalgam Terror Attack News : पहलगाम हल्ल्याबाबत फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य; म्हणाले, 'आम्ही मध्येच अडकतो...'

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सुरक्षा विभाग सतर्क झाला असून आंतरराष्ट्रीय सीमेवर कारवाईला वेग आला आहे. दरम्यान जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी, पहलगाममधील घटना खूप वेदनादायक असून अशा घटनांमुळे समाजातील द्वेष वाढतो. लोकांमध्ये दरी वाढते. हा कोणाचा हेतू आहे? अशा लोकांमुळे मात्र आम्ही मात्र मध्येच अडकतो. काश्मिरी जनतेला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

India-Pakistan Border News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बीएसएफची मोठी कारवाई; हातबॉम्ब, पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सुरक्षा विभाग सतर्क झाला असून आंतरराष्ट्रीय सीमेवर कारवाईला वेग आला आहे. दरम्यान बीएसएफने पंजाब पोलिसांच्या समन्वयाने अमृतसर जिल्ह्यातील भरोपाल गावाजवळ मोठी कारवाई केली. यावेळी बीएसएफने हातबॉम्ब, पिस्तूलांसह जिवंत काडतुसे जप्त केली असून दहशतवादी कट उधळून लावला आहे. दोन हातबॉम्ब, तीन पिस्तूल, सहा मॅगझिन आणि 50 जिवंत काडतुसे बीएसएफने जप्त केली आहेत.

Raju Shetti News : 'हे सरकारही अतिरेकीच'; शेतकरी आत्महत्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना, माळसोन्ना ते परभणी अशी आक्रोश पदयात्रा काढली. माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दाम्पत्याने कर्जामुळे आत्महत्या केली. दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे फक्त सरकारच्या धोरणामुळे होत आहे. यामुळे हे सरकारदेखील अतिरेकीच असल्याची टीका केलीय.

Chandrakant Patil Shaktipeeth Highway News : शक्तिपीठ महामार्गा विरोधी शेतकऱ्यांचा संताप? पालमंत्री चंद्रकांत पाटलांना घेरावं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रिम प्रोजेक्टला राज्यात विरोध होत असून तो रद्द करण्याची मागणी होत आहे. मात्र सरकार तो रेटत असल्याने आता शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान आज शक्तिपीठ महामार्गा विरोधी शेतकऱ्यांनी पालमंत्री चंद्रकांत पाटलांना घेरावं घालत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली.

Chandrakant Patil News : पाणीटंचाई नाही...

मागील काही दिवसांपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे शेकडो गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात फारशी पाणीचंटाई जाणवणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राज्याला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठी धरणांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.

WAVES Summit News : भारतीय संगीत लवकरच जगाची ओळख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत वेव्हज परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारताकडे हजारो वर्षांचा कथांचा खजिना आहे. लोककलेने इतिहास जिवंत ठेवलाय. भारताच्या कानाकोपऱ्यात अद्भूत टॅलेंट आहे. भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. भारतीय कॉन्टेन्टची जगाला भुरळ पडली आहे. भारतीय संगीतही जगाची लवकरच ओळख बनेल. भारतात ऑरेंज इकॉनॉमीची सुरूवात होतेय.  

Pakistan Citizens : देश सोडण्यास मुदतवाढ

भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेली मुदत वाढविण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार आता पुढील आदेश येईपर्यंत त्यांना देश सोडता येईल. यापूर्वी ३० एप्रिलपर्यंत अखेरची मुदत होती. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधी की - संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचे निर्णय जाहीर केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा विषय राहुल गांधी यांनी उचलून धरला होता. अखेर मोदींना राहुल गांधींसमोर गुडघे टेकायला लागले. सरकार मोदी की सिस्टीम राहुल गांधी की, असा टोला देखील राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींचे मुंबईत आगमन

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आज भारताच्या पहिल्या 'जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन' (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांचे मुंबईत आगमन झाले आहे.

रायगडमध्ये आदिती तटकरेंच्या हस्ते झेंडावंदन

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. तरी देखील महाराष्ट्र दिनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झेंडावंदनाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला. तटकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडावंदन केले. तटकरे यांनी अलिबागमध्ये झेंडावंदन केले तर महाडमध्ये भरत गोगावले यांनी झेंडावंदन केले.

भारताच्या विकासात महाराष्ट्राची महत्वाची भूमिका, पंतप्रधान मोदींनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत महाराष्ट्र दिना निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.

Devendra Fadnavis : जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे महाराष्ट्र दिनी उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णावर उपाचार करू न शकणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना जिल्हास्तरावरच मदत मिळणार आहे.

Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेकडून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी हुतात्मा चौक येथील संयुक्त महाराष्ट्रातल्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार सुनील प्रभूंसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Pune Sinhagad Road : सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन संपन्न

पुण्याती बहुप्रतिक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पुलाचे काम पूर्ण होऊन देखील तो नागरिकांसाठी खुला न केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर आज हा पूल सर्वांसाठी सुरू करण्यात आला आहे.

Narendra Modi : PM मोदी आज मुंबईत

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आज भारताच्या पहिल्या 'जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन' (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज'या घोषवाक्याखाली होणाऱ्या 4 दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.