आष्टा : येथे ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. संदीप बाळासाहेब घोडके (वय ४६, रा. कवठेपिरान, ता. मिरज; सध्या रा. गांधीनगर, आष्टा ता. वाळवा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत सदानंद शिवलिंग कोरे (वय ३२ गणपती मंदिराजवळ आष्टा, ता. वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली असून, ट्रॅक्टरचालक प्रवीण विलास पाटोळे (मुंबई तलावाजवळ, आष्टा) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (ता. २९) दुपारी ३.४५ च्या सुमारास आष्टा-दुधगाव रस्त्यावर आधार वृद्धाश्रमासमोर आष्टा येथे सदानंद कोरे यांचे चुलत दाजी संदीप घोडके आपल्या दुचाकीवरून (एमएच १०, इजे ८६६०) जात असताना पाठीमागून ट्रॅक्टर (एमएच १०, सीएन ९३४७) घेऊन आलेल्या प्रवीण पाटोळे यांनी दुचाकीला जोरात धडक दिली. यात संदीप घोडके गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी प्रथम आष्टा रुग्णालयात दाखल करण्यात आले व पुढील उपचारांसाठी त्यांना सांगली येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.