जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. यामुळे अमेरिकेकडून राजनैतिक पुढाकार सुरू केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्यावेळी शरीफ यांना अमेरिकेने फटाकरले आहे. तपासात सहकार्य करण्याचे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्को रुबियो यांनी डॉ. एस. जयशंकर यांच्याशी फोनवर संवाद साधला. यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केला. तसेच पीडितांच्या कुटुंबियांना संवेदना व्यक्त केल्या. दहशतवादाविरुद्धच्या जागतिक लढाईत अमेरिकेची भारताप्रती असलेली वचनबद्धता त्यांनी पुन्हा सांगितली.
मार्को रुबियो यांनी शहबाज शरीफ यांच्यासोबत चर्चा केली. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहबाज शरीफ यांनी अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांना पाकिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. तसेच भारताकडून सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केले जात असल्याचा आरोप केला. पहलगाम हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याचा भारताचा आरोप शरीफ यांनी या चर्चेत फेटाळून लावला. पहलगाम हल्ल्याची चौकशी निष्पक्ष पद्धतीने करण्याची मागणी त्यांनी रुबिया यांच्याकडे केली.
भारताच्या कारवाईची चांगलीच धास्ती पाकिस्तानने घेतली आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान शेअर बाजारावर दिसून आला. बुधवारी पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला होता. ३२०० अंकांना पाकिस्तान शेअर बाजार घसरला होता. पाकिस्तानचे मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी भारत हल्ला करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद शेअर बाजारात दिसले. संयुक्त राष्ट्र संघाने भारत आणि पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीचा प्रयत्न केला. दोन्ही देशांनी संघर्ष टाळावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाने केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानविरोधात भारताने कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाच बैठका घेतल्या. त्या बैठकांमध्ये पाकिस्तानबाबत कारवाईसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच सांगितले आहे.