पंजाब किंग्सने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होम टीम चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. चेन्नईने पंजाबला विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 6 विकेट्स गमावून आणि 2 चेंडूंआधी पूर्ण केलं. पंजाबने 19.4 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंह या दोघांनी बॅटिंगने पंजाबच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबने यासह आयपीएल 2025 मधील एकूण सहावा विजय मिळवला. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा तर एकूण आठवा पराभव ठरला. तसेच चेन्नईची ही घरच्या मैदानात पराभूत होण्याची पाचवी वेळ ठरली. चेन्नईचं या पराभवासह आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्ठात आलं आहे. चेन्नई या हंगामातील साखळी फेरीतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली.