आयपीएल स्पर्धेतील 18 व्या मोसमात गेल्या काही दिवसांपासून 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचीच चर्चाच पाहायला मिळत आहे. वैभवने 19 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पदार्पण केलं. वैभवने आयपीएल कारकीर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वैभवने त्या सामन्यात 20 चेंडूत 34 धावा केल्या. वैभवने दुसऱ्या सामन्यात आरसीबी विरुद्ध 16 धावा केल्या. त्यानंतर वैभवने 28 एप्रिलला आपल्या कारकीर्दीतील तिसर्याच सामन्यात ते करुन दाखवलं जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला जमलं नाही. वैभवने गुजरात टायटन्स विरुद्ध अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावलं. वैभवने यासह युसूफ पठाण याचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि तो आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. वैभवने या सामन्यात एकूण 101 धावांची खेळी केली. वैभवने या खेळीसह असंख्य विक्रम आपल्या नावावर केलं. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षी अनेक दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. मात्र वैभवने इतक्या कमी वयात आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं? याबाबत अनेकांना उत्सूकता लागून आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ऑक्शनआधी खेळाडूंना नावनोंदणी करावी लागते. तसेच त्यांची बेस प्राईजही जाहीर करावी लागते. त्यानंतर संबंधित यंत्रणा नोंदणी केलेल्या एकूण खेळाडूंपैकी मोजक्यांचीच निवड करते. त्यानंतर बीसीसीआयकडून त्या निवडक खेळाडूंची नावं जाहीर केली जातात. त्यानंतर एकूण 10 फ्रँचायजींकडून गरजेनुसार खेळाडूंची निवड केली जाते. मात्र या ऑक्शनमध्येही निवड खेळाडूंनाच घेतलं जातं. त्यामुळे अनेक खेळाडू अनसोल्ड राहतात. मात्र यातही वयाच्या 13 व्या वर्षी वैभवने बाजी मारली.
वैभववर राजस्थान रॉयल्सने विश्वास दाखवला आणि त्याला आपल्यात घेतलं. राजस्थानने वैभवसाठी 1 कोटी 10 लाख रुपये मोजले. या 13 वर्षांच्या खेळाडूसाठी 1 कोटी रुपये मोजल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र आता हा मास्टरस्ट्रोक समजला जात आहे. राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांनी स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत वैभवने अवघ्या 6 चेंडूत आयपीएल कॉन्ट्रॅक्ट कसं मिळवलं? याबाबत सांगितलं.
राजस्थान रॉयल्स मॅनेजमेंटने वैभवला ट्रायलसाठी बोलावलं होतं. वैभव तिथे एक ओव्हर खेळला. त्यानंतर वैभवबाबत आम्ही ठरवलं.
“राजस्थान रॉयल्स 2008 पासून युवा खेळाडूंकडे लक्ष केंद्रीत करत असून त्यांना टीम इंडियाकडून खेळण्यासाठी तयार करत आहे. वैभवने त्याआधी अंडर 19 आशिया कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. वैभव देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारसाठी खेळत होता. त्यामुळे आम्ही तेव्हा बिहार क्रिकेट असोसिएशनकडे वैभवला ट्रायलसाठी पाठवावं अशी विनंती केली. ट्रायल दरम्यान राहुल द्रविड, जुबिन भरुचा आणि विक्रम राठोड हे तिघे उपस्थित होते. वैभवने त्या एका ओव्हरमध्ये प्रतिभा दाखवून दिली. वैभवने त्याच्या खेळीने या तिघांची मनं जिंकली. आम्ही वैभवला ऑक्शनमधून घेतलं हे भाग्याची गोष्ट ठरली. वैभव ऑक्शननंतर पुढील 3 महिन्यांपर्यंत आमच्यासोबत नागपूरमधील राजस्थान रॉयल्सच्या हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये होता. वैभवने तिथे फार सराव केला”, असं भिंडर म्हणाले.
“तो लहान मुलगा आहे. त्याने नागपूरमध्ये एका ओव्हरचा सामना केला, त्यातून हे सिद्ध झालं की हा प्रतिभावान खेळाडू आहे. मला तिथूनच द्रविड आणि जुबीन या दोघांनी कॉल करुन वैभववर लक्ष ठेवण्यास सांगितलं. तसेच वैभवच्या आई-वडिलांसह बोलणं करुन घेण्यास सांगितलं. आपण याला घेण्याचे प्रयत्न करु. वैभवला आपल्यासोबत ठेवूयात, जरी त्याला या वर्षी घेता आलं तरी चालेल. मात्र सुदैवाने वैभवला आम्ही ऑक्शनमधून घेऊ शकलो”, असा इनसाईड किस्सा भिंडर यांनी सांगितला.
आता त्या एका ओव्हरमध्ये असं नक्की काय काय झालं? हे सुद्धा भिंडर यांनी सांगितलं. राजस्थानने वैभवला ट्रायल दरम्यान पावरप्लेमध्ये खेळण्याचं आव्हान दिलं. वैभवला वेगवेगळ्या गोलंदाजांनी त्यांच्या वेगाने बॉलिंग केली. वैभव या गोलंदाजांचा कसा सामना करते, हे पाहिलं गेलं.
“वैभवमध्ये प्रतिभा आहे, हे काही लपून राहिलेलं नाही. मात्र आयपीएलमध्ये खेळणं एक वेगळचं आव्हान असतं. अशात आमचा त्याला पूरिपूर्ण करण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी वैभववर फार मेहनत घेतली. तसेच राहुल द्रविड आणि भरुचा या दोघांमुळे वैभवमध्ये फार सुधारणा झाली”, असं म्हणत भिंडर यांनी वैभवसारख्या खेळाडूला घडवण्याचं संपूर्ण श्रेय हे या तिघांना दिलं.