मैत्रिणीच्या लग्नात गेलेली १७ वर्षीय तरुणी, घरी परतताना ९ जणांकडून ६ तास अत्याचार; तिथेच बेशुद्ध पडली
esakal May 01, 2025 02:45 AM

एका १७ वर्षांच्या तरुणीवर मंगळवारी रात्री ९ जणांना बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. पीडीत तरुणी तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेली होती. राजस्थानच्या झालावाड इथं ही घटना घडलीय. झालावाडच्या अकलेरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. काही तासांनी बुधवारी पहाटे तरुणी घरी पोहोचल्यानंतर तिनं हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिचे कुटुंबिय पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले. पीडितेवर अत्याचार करणारे सर्व आरोपी तिच्या ओळखीचे असून गावातच राहणारे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता रात्री दहा वाजता मैत्रिणीकडे गेली होती. तिचा लग्न सोहळा सुरू होता. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिथून पीडिता निघाली. त्यावेळी ९ तरुणांनी तिचं अपहरण केलं. आरोपींनी पीडितेला निर्जन स्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सर्व आरोपींचं वय २० वर्षांच्या जवळपास आहे.

पीडिता रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचली नव्हती. तेव्हा कुटुंबियांना वाटलं की ती मैत्रिणीच्या घरी असेल. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर ६ तासांपेक्षा जास्त वेळ अत्याचार केला. पीडितेला त्याच शेतात सोडून ते फरार झाले. यावेळी अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली होती. तिला शुद्ध आल्यानंतर घरी परतली. घरी येताच तिनं घडलेला सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला.

सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील सदस्य पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणी ९ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.