मोखाड्यात जल जीवन योजनेचा बोजवारा
esakal May 01, 2025 03:45 AM

मोखाडा, ता. ३० (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात सर्वत्र जल जीवन याेजनेच्या कामाचे धिंडवडे निघाले आहेत. पाणीटंचाईबाबत अतिसंवेदनशील मोखाडा तालुक्यातील आसे ग्रामपंचायत हद्दीतील भोवाडी या महसूल गावात या योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे श्रमजीवी संघटना आक्रमक झाली. त्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने पाणीपुरवठा प्रशासन नमले असून येथे विहिरीत पाणी सोडण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे पाणीटंचाईने होरपळलेल्या येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जल जीवन योजनेच्या भोवाडी गावाच्या बाजूच्या तीन किमी अंतरावर असलेल्या कुंडाचापाडा या गावात सुमारे ४० हजार लिटरची पाण्याची साठवण टाकी उभारली आहे. आठशेच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या या गावात १८५ नळजाेडणी देण्यात आल्या आहेत. मात्र फक्त २० नळजाेडणीला पाणी येत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे तालुका सचिव ईश्वर बांबरे यांनी केला आहे. या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून आंदोलनाचा इशारा संघटनेने पाणीपुरवठा विभागाला दिला होता.

आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ललित बोरदे आणि त्यांचे सहकारी गावात दाखल झाले. तेथील समस्या जाणून घेतली. या वेळी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जलजीवन योजनेचे स्वरुप आणि शासन निर्णय सांगून अधिकाऱ्यांचीच शाळा घेतली. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा बघून अधिकाऱ्यांची पाचावर धारण झाली. जोपर्यंत नळयोजनेचे पूर्ण जाेडणी होत नाही, तोपर्यंत विहिरीत पाणी दिले जाईल, तसेच लवकरच टाकीची व्यवस्था करून गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन ललित बोरदे यांनी दिल्याने ग्रामस्थ शांत झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.