चिंचवड, ता.३० ः चिंचवड ते आकुर्डी अर्धा रस्ता ‘अ’ प्रभागमध्ये तर उर्वरित अर्धा रस्ता ‘ब’ प्रभागामध्ये येतो. त्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून चिंचवडगावपासून ते दळवीनगरपर्यंत साफसफाईचा अभाव दिसून येत आहे. कचरा संकलन वाहने ठराविक ठिकाणचाच कचरा गोळा करत असल्याने उर्वरित कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहत आहे. त्यामुळे कचरा वेळेत उचलला जावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिंचवडगावपासून ते दळवीनगर रस्त्याच्या बाजूला बऱ्याच वेळा मोठमोठे ट्रक, बस सारखी अवजड वाहने अवैधरीत्या उभी केली असतात. त्यामुळे त्या वाहनांच्या खालची साफसफाई देखील होत नाही. ‘ब’ प्रभागमधील अर्ध्या रस्त्याच्या हद्दीमध्ये साफसफाईचा अभाव दिसून येत आहे. दोन्ही बाजूंच्या पदपथावरून नागरिक ये-जा करत असतात. तरी देखील रस्त्यालगतचा कचरा कित्येक दिवस गोळा केला जात नाही. दुकानदार स्वतः त्यांच्या दुकानासमोरील कचरा झाडून गोळा करून ठेवतात. परंतु गोळा केलेले कचऱ्याचे ढीग तसेच कित्येक दिवस पडून असतात.
कचरा संकलन वाहन ठराविक ठिकाणचा कचरा नेतात. बाकी कचरा तसाच दहा ते बारा दिवस पडून असतो. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरते. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्यावर तात्पुरत्या स्वरूपात कामे होतात. परंतु, कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. कचरा वेळेत उचलायला हवा.
- सुभाष जाधव, स्थानिक रहिवासी
प्रेमलोक पार्क ते भोईरनगर चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूला दुकानांच्या समोरील कचरा झाडला जात नाही. त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसांपासून तसेच ढीग पडून असतात. कचऱ्याबाबत तक्रार केल्यानंतर गांभीर्याने दाखल घ्यायला हवी.
- रवींद्र घाडगे, स्थानिक नागरिक
आमच्या हद्दीमध्ये काही ट्रक निनावी पद्धतीने बरेच दिवसांपासून उभे होते. ते आम्ही वाहतूक विभागाला तक्रार करून ते ट्रक काढून घेतले आहेत. त्याखालील सर्व कचरा साफ करून घेतला आहे.
- राजू साबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय
जेथे कचरा साठलेला आहे. तेथे संपूर्ण साफसफाई लवकरच केली जाईल.
- भूषण शिंदे, मुख्य आरोग्य निरीक्षक, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
CWD25A00975