खारघर, ता. ३० (बातमीदार) : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून खारघर सेक्टर १२ येथील गावदेवी मैदानावर गुरुवारपासून (ता. १ ते ४ मे) भाजप सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवात मनोरंजन, इतिहास, कला तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील सांस्कृतिक संगम पाहायला मिळणार आहे.
गुरुवारी (ता. १) सायंकाळी सहा वाजता ९० कलाकारांच्या संचासह महाराष्ट्राची महासंस्कृती कार्यक्रम होणार असून, या वेळी राज्याच्या विविध सांस्कृतिक परंपरा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य सादरीकरण होणार आहे. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी सहा वाजता खारघर आणि पनवेल परिसरातील विविध संस्थांचा सांस्कृतिक कलाविष्कार; तर शनिवारी (ता. ३) सायंकाळी सहा वाजता गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे यांच्या सुमधुर गाण्यांची मैफल रंगणार आहे. रविवारी (ता. ४) समूह नृत्याचा कार्यक्रम आहे. या महोत्सवात चारही दिवस सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत महाराष्ट्राच्या विविध भागांतील चविष्ट मिसळचे स्टॉल्स असणारा मिसळ महोत्सव तसेच ऐतिहासिक शस्त्रांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. खारघरसह परिसरातील नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.