CSK vs PBKS : “सॅम करन-डेवाल्ड ब्रेव्हीस..”, चेन्नई IPL 2025 मधून ‘आऊट’ झाल्यानंतर कॅप्टन धोनी स्पष्टच म्हणाला
GH News May 01, 2025 04:05 AM

आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी चेन्नई सुपर किंग्स टीमला गुरुवारी 30 एप्रिलला पराभवाचा सामना करावा लागला. आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 49 वा सामना चेन्नई सुर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात आला. पाहुण्या पंजाबसमोर चेन्नईला घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. युझवेंद्र चहल याने एका ओव्हरमध्ये हॅटट्रिकसह घेतलेल्या 4 विकेट्समुळे चेन्नई 19.2 ओव्हरमध्ये 190 रन्सवर ढेर झाली. चेन्नईसाठी सॅम करन याने सर्वाधिक 88 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने 6 विकेट्सच्या मोबदल्यात विजयी धावा पूर्ण केल्या. पंजाबने 19.4 ओव्हरमध्ये 194 रन्स केल्या आणि 4 विकेट्सने विजय मिळवला.

चहलची निर्णायक भूमिका

एकट्या युझवेंद्र चहल याने चेन्नईच्या चौघांना आऊट करत निर्णायक भूमिका बजावली. चहलने चेन्नईच्या डावातील 19 व्या ओव्हरमध्ये महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर दीपक हुड्डा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद या तिघांना सलग आऊट करत हॅटट्रिक घेतली. चहलची आयपीएलमधील ही एकूण दुसरी तर या हंगामातील पहिली हॅटट्रिक ठरली. चहलने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. पंजाबचा हा या मोसमातील सहावा विजय ठरला. चेन्नई आठव्यांदा पराभूत झाली. चेन्नईचा या पराभवासह या हंगामातून बाजार उठला. चेन्नई या हंगामातून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली. चेन्नईच्या या स्थितीनंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी संतापला. त्याने या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? जाणून घेऊयात.

महेंद्रसिंह धोनी काय म्हणाला?

धोनीने सामन्यानंतर महत्त्वाचं वक्तव्य केलं. धोनीने फिल्डर्सवर पराभवाचं खापर फोडलं. “आम्ही पहिल्यांदा पुरेशा धावा केल्या होत्या. पण मला वाटतं की या धावा काहीअंशी कमी होत्या. फलंदाजांसाठी थोडं अवघड होतं, मात्र आम्हाला आणखी काही धावांची गरज होती. सॅम करन आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या दोघांमध्ये शानदार भागीदारी झाली. मला वाटतं की आम्हाला कॅच घेण्याची गरज होती”, असं धोनीने म्हटलं. तसेच धोनीने सॅमचं तोंडभरून कौतुक केलं. “सॅम हा एक योद्धा आहे, हे सर्वांना माहितीय”, असंही धोनीने म्हटलं.

खेळपट्टीबाबत काय म्हणाला?

“ही एक संथ खेळपट्टी होती. मात्र आजची खेळपट्टी या मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम अशी होती”,असं धोनीने नमूद केलं. तसेच धोनीने डेवाल्ड ब्रेव्हीस याचंही कौतुक केलं. “डेवाल्ड हा एक तगडा फलंदाज आणि चांगला फिल्डर आहे. त्याच्याकडे ताकद आहे. त्यामुळे तो चांगल्या चेंडूवरही चौकार लगावू शकतो. तो मैदानात ऊर्जा बनवून ठेवतो. आम्हाला सकारात्मकतेची गरज आहे. त्यामुळे डेवाल्ड भविष्यात उल्लेखनीय कामगिरी करु शकतो”, असा विश्वास धोनीने व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.