चिंचवडमधील तालेरा रुग्णालयाची कामे रेंगाळलेलीच
esakal May 02, 2025 09:45 PM

अश्विनी पवार : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. २ : चिंचवडगाव व परिसरातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी उभारण्यात येणाऱ्या नवीन तालेरा रुग्णालयाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. २०१८ मध्ये रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन मल्टिस्पेशलिटी रुग्णालय बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, सात वर्षे उलटल्यानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयातून होणारे स्थलांतरही रेंगाळले आहे.

तालेरा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये दररोज ४०० ते ५०० जण उपचारासाठी येत होते. रुग्णांची संख्या पाहता रुग्णालयाची जागा अपुरी पडू लागल्याने शेजारीच २००८- २००९ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय उभारण्यात आले. २०१५ मध्ये या रुग्णालयाचे उद्घाटन झाले. तालेरा रुग्णालयाची इमारत देखील जुनी झाल्याने तिचे याच काळात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. तसेच जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१८ मध्ये या इमारतीच्या उभारणीचे आदेश देण्यात आले. हे काम २०२० पर्यंत होणे अपेक्षित होते. २०२० मध्ये कोरोनामुळे बांधकामात खंड पडला. मात्र, त्यानंतर चार वर्षे उलटूनही हे काम पूर्ण झालेले नाही. रुग्णालयात फर्निचर, रंगरंगोटी, इलेक्ट्रिक आदी कामे सध्या सुरू आहेत. येथे बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला असला, तरी रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक अशी अनेक कामे रेंगाळली आहेत.

बाह्यरुग्ण, स्त्रीरोग विभाग सुरू
गर्भवती व नवजात बालकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हे रुग्णालय मदर ॲण्ड चाइल्ड केअर स्पेशॅलिटी हॉस्पिटल करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने येथे अद्ययावत स्त्रीरोग विभाग उभारण्यात आला आहे. सध्या बाह्यरुग्ण विभाग व स्त्रीरोग विभाग हे दोनच विभाग कार्यरत आहेत. या विभागामध्ये सोनोग्राफीचीही सुविधा आहे. या रुग्णालयातील माता व बाल आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

असे आहे रुग्णालय
- एकूण पाच मजले
- बाह्यरुग्ण विभागात १२ तपासणी कक्ष
- औषध विक्री केंद्र
- अद्ययावत शस्त्रक्रिया कक्ष
- अतिदक्षता विभाग
- पॅथॉलॉजी लॅब
- क्ष किरण तपासणी व सिटी स्कॅन
- डायलिसिस विभाग,
- मेडिसिन वॉर्ड
- सर्जिकल विभाग
- स्त्री रोग विभाग
- प्रसूती कक्ष
- माता व नवजात शिशू विभाग
- नवजात अतिदक्षता विभाग
- दुचाकी, चारचाकी गाड्यांचे पार्किंग
- उपहारगृह

तालेरा रुग्णालयाची इमारत ही अत्यंत जुनी झाली होती. त्यामुळे २०१५ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाची उभारण्यात आली. त्यानंतर २०१८ मध्ये तालेरा रुग्णालयाची इमारत पाडून नवीन बांधकाम सुरू झाले. गरीब व सर्वसामान्य गर्भवतींना उपचार मिळावेत यासाठी हे महापालिकेचे एक रुग्णालय मदर ॲण्ड चाइल्ड केअर स्पेशॅलिटी असावे असा या मागचा उद्देश्य होता. त्यादृष्टीने हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.
- अपर्णा डोके, माजी महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

नवीन तालेरा रुग्णालयात सध्या काही विभाग सुरू करण्यात आले आहेत. या रुग्णालयात लवकरच माता व बाल आरोग्य विभाग व त्याच्याशी संबंधित वैद्यकीय सेवा लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. इतर विभागांचे कामही पुढील सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल.

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.