Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad Marathi News: गुजरात टायटन्सचा कर्णधार आज अम्पायरवर प्रचंड संतापलेला दिसला. प्रथम त्याला रन आऊट दिल्यानंतर मैदानाबाहेर सामनाधिकाऱ्यांसोबत राडा घातला, त्यानंतर सनरायझर्स हैदराबादच्या डावात एका निर्णयावर तो अम्पायरला भिडला.
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम यजमान गुजरात टायटन्सने दणाणून सोडले. साई सुदर्श व शुभमन गिल यांनी पॉवर प्लेमध्येच ८२ धावा चोपून आपले इरादे स्पष्ट केले होते. त्यानंतर जॉस बटलरच्या फिनिशींग टचला तोड नव्हता. गिलच्या रन आऊटमुळे वातावरण थोडे तापले होते, परंतु गुजरातला ६ बाद २२४ धावांपर्यंत पोहोचता आले. खरं तर जशी सुरुवात झाली होती, ते पाहता २४० धावा अपेक्षित होत्या, परंतु हैदराबादच्या गोलंदाजांनी अखेरच्या टप्प्यात चांगला मारा केला. हैदराबादच्या क्षेत्ररक्षकांनी काही सोपे झेल टाकले अन् चौकारही सोडले.
साई सुदर्शन २३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतला. साई व शुभमन यांनी ४१ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी केली. बटलरने गिलसोबत ३७ चेंडूंत ६२ धावा जोडल्या. शुभमनला ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर माघारी जावे लागले. गिलच्या विकेटनंतर काही काळासाठी गुजरातची धावगती संथ झाली होती, परंतु बटलरने हात मोकळे केले. बटलर ३७ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६४ धावांवर झेलबाद झाला. वॉशिंग्टन सुंदरच्या २१ धावांनी संघाला २२४ धावांपर्यंत पोहोचवले. हैदराबादकडून जयदेव उनाडकटने तीन विकेट्स घेतल्या.
अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी SRH ला अपेक्षित सुरुवात करून देताना ४.३ षटकांत ४९ धावा फलकावर चढवल्या. प्रसिद्ध कृष्णाने टाकलेला चेंडू हेडने उत्तुंग उडवला, परंतु राशिद खानने सामीरेषेनजीक तितक्याच चपळाईने तो झेल टिपला. हेडने १६ चेंडूंत ४ चौकारांसह २० धावा केल्या. राशिदच्या अविश्वसनीय झेलनंतर प्रसिद्ध कृष्णाने दहाव्या षटकात एक चांगला झेल टिपला. इशान किशन १३ धावांवर गेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
दोन विकेट पडल्याने अभिषेकवर दडपण जाणवत होते आणि हेनरिच क्लासेनही सावध खेळ करताना दिसला. हैदराबादने १० षटकांत १०० धावा फलकावर चढवल्या होत्या आणि त्यांना पुढील ६० चेंडूंत १२५ धावा करायच्या होत्या. अभिषेकने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करण्यासाठी २ चौकार व ५ खणखणीत षटकार खेचले. गुजरातचे खेळाडू एकेक धाव वाचवण्यासाठी स्वतःला झोकून देत होते.
राहुल तेवाटियाने षटकार जाणारा चेंडू ज्या पद्धतीने अवडला, ते पाहून सारेच अवाक् झाले. १४व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर अभिषेकसाठी LBW ची अपील झाले. अम्पायरने नाबाद देताच गिलने DRS घेतला. चौथ्या अम्पायरने मैदानावरील अम्पायरचा निर्णय कायम राखला आणि दिल्याने गिलचा पारा चढला... यावेळी अभिषेक त्याला शांत राहण्यासाठी सांगताना दिसला.