Maherchi Saadi : अजिंक्य देवला वाटलं होतं माहेरची साडी फ्लॉप होईल.. एक चूक केली अन् अजूनही बसतोय ओरडा
esakal May 03, 2025 03:45 PM

अजिंक्य देव याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अजिंक्य देव यांना 'माहेरची साडी' चित्रपटानंतर खूप प्रसिद्धी मिळाली. 3 मे 1963 मध्ये अजिंक्य देव यांचा जन्म झाला. अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे ते चिरंजीव आहे. अजिंक्य देव यांना 2016 मध्ये महाराजा यशवंतराव गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

दरम्यान यांनी काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'माहेरची साडी' या चित्रपटाबाबतच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर केल्या. ते म्हणाले की, 'सुरुवातीला माहेरची साडी हा चित्रपट फ्लॉप होईल असं वाटलेलं. परंतु चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट ठरला. मला कधी वाटलं पण नव्हतं की हा चित्रपट इतका चालेल.'

यांनी 'माहेरची साडी' या चित्रपटाबाबत एक किस्सा शेअर केला आहे. ते म्हणाले की, 'माहेरची साडी चित्रपटासाठी विजय कोंडकेंनी मला बोलावलं होतं. विजय कोंडकेंनी चित्रपटाची स्टोरी ऐकवली. त्यांनी मला कुठल्या सीनला महिला रडणार, टाळ्या वाजणार इतपर्यंत सगळं सांगितलं. माझ्यासाठी हे फनी होतं. पण चित्रपट रिलीज झाला आणि विजय कोंडके यांनी सांगितल्याप्रमाणे घडलं. ट्रकभरुन बायका माहेरची साडी चित्रपट पहायला येयला लागल्या.'

पुढे बोलताना अजिंक्य म्हणाले की, 'चित्रपटात एक गाणं होतं. 'नेसली माहेरची साडी.' हे गाणं सहा कडवी होतं. तेव्हा आम्ही विजय कोंडकेंना कोपऱ्यात घेऊन बोललो की, एवढं कोण गाणं ऐकणार? चारच कडवी गाणं करा. त्यानंतर ते गाणं चार कडव्यांचं करण्यात आलं. चित्रपट रिलीज झाला आणि गाणं सुपरहीट झालं. तेव्हा विजय कोंडके येऊन आम्हाला खूप ओरडले. म्हणाले की, हे चार कडव्यांचं गाणं इतकं चालतय, तर ते सहा कडव्याचं गाणं किती चाललं असतं? आजही ते भेटले की आम्हाला ओरडतात.'

अजिंक्य देव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर घरत गणपती या चित्रपटात शरद घरत यांची भूमिका साकारली होती. अजिंक्य देव यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.