किशोरी शहाणे - अभिनेत्री
माझी आई नेहमीच माझ्यासाठी मार्गदर्शक राहिलेली आहे. बिनशर्त प्रेम, शक्ती आणि धैर्याचा ती स्रोत आहे. तिचे शांत समर्थन आणि माझ्यामधील अढळ विश्वास यामुळे मार्ग कितीही कठीण असला, तरी मला आयुष्यात पुढे जाण्यास मदत झाली आहे.
माझी आई आम्हा तिघी बहिणींच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आमच्यासोबत आहे. आमच्या वेण्या बांधायच्या असोत, आमचा डबा भरायचा असो किंवा सकाळी उठून आमची काहीही छोटी-मोठी कामे करणे असो. आम्ही रात्रभर जागून अभ्यास करत असताना गरम दुधाचा ग्लास घेऊन तीही आमच्यासाठी जागली. आमच्या कुटुंबातील प्रत्येक चढ-उतारामध्ये आमच्या आईची उपस्थिती हाच एक धागा आहे, ज्याने आमच्या परिवाराला बांधून ठेवले आहे.
माझी आई खूपच उत्कृष्ट जेवण बनवते आणि सर्व ग्लॅमरस गोष्टींबद्दल तिला अतिशय प्रेम आहे. तिने नेहमीच माझ्या कारकिर्दीचा अतिशय उत्साहाने पाठपुरावा केला आहे. माझ्या अभिनयातील कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर तिची मला भक्कम साथ मिळाली आहे.
मी सध्या झी टीव्हीवर ‘कैसे मुझे तुम मिल गये’ या मालिकेमध्ये बबिताची भूमिका साकारत आहे. ही मालिका पाहायला तिला अतिशय आवडते. या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय वळण येणार आहे, याबद्दल ती उत्सुक असते. ती समाजात वावरणारी आहे. जिथे जाईल तिथे आपुलकीने राहते. तिची स्टाईल, तिची ऊर्जा आणि तिची सोशल असण्याची क्षमता या गोष्टी मला तिच्याकडूनच मिळाल्या आहेत आणि मला त्यांचा अभिमान आहे.
माझी आई कायमच स्टायलिश पेहरावांमध्ये असते. अतिशय सुंदर पद्धतीने आणि आत्मविश्वासाने वावरते. ती अगदी टिप–टॉप दिसत असल्याशिवाय घराबाहेर कधीच पडत नाही. ती ज्या पद्धतीने स्वतःची काळजी घेते, ते मला खूप आवडते आणि तसे मीही राहावे असे मला वाटते. आपल्या मैत्रिणींसोबत बाहेर जाणे, नवीन ठिकाणांना भेट देणे आणि कायम सक्रिय राहणे, आयुष्याप्रती तिचे चैतन्य हे मी नक्कीच तिच्याकडूनच शिकले आहे.
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग म्हणजे माझी डिलिव्हरी जेव्हा होणार होती, तेव्हा माझी आई माझ्या बाजूला होती. तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही - कारण त्यामुळे माझ्या मनात सुरक्षेची भावना निर्माण झाली. कारण जेव्हा खूप सारा तणाव आणि वेदनांमधून मी जात होते, तेव्हा ती मला सांभाळत होती, माझ्या पाठीवरून हात फिरवत होती आणि माझी काळजी घेत होती. तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
मला हेही सांगावेसे वाटते, की मीही एक आई आहे आणि माझा मुलगा बॉबी विजसाठी आईपण निभावते, तेव्हा माझ्या मनात जबाबदारीची एक खोल जाणीव असते. त्याची काळजी घेणे, त्याला मार्गदर्शन करणे आणि त्याच्या भविष्यामध्ये त्याला एक बळकट आणि अर्थपूर्ण मार्ग निवडण्यामध्ये मदत करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटते. त्याचवेळेस, मला ही जाणीव आहे, की आजच्या पिढीचा दृष्टिकोन वेगळा आहे, त्यांना ‘स्पेस’ द्यावी लागते आणि त्यांच्या ज्ञानासोबत समजून घ्यावे लागते. त्यामुळे त्यांच्याकडून शिका आणि काळानुसार स्वतःलाही अपडेट करा म्हणजे तुमच्या विचारांमध्ये ‘जनरेशनल गॅप’ राहणार नाही. मला खरेच वाटते, की आधुनिक मातृत्वासाठी नवीन प्रकारच्या संतुलनाची गरज आहे. आमच्या आईने आम्हाला ज्या पद्धतीने मोठे केले, त्यापेक्षा हे वेगळे आहे. त्यामुळे आई हीसुद्धा एक माणूसच आहे आणि तिलाही काळासोबत आणि आपल्या मुलांसोबत प्रगल्भ व्हायला हवे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)