दशक्रिया विधीत पारव्यांचा उपद्रव
esakal May 03, 2025 06:45 PM

पुणे, ता. २ : शहरात पारव्यांचा त्रास वाढलेला असताना आता त्यांचा उपद्रव दशक्रिया विधी करणाऱ्या नागरिकांनाही होऊ लागला आहे. दशक्रिया विधीच्या ठिकाणी कावळ्यांऐवजी पारवे व कबुतरांचे अतिक्रमण वाढले असल्याने या विधीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पारव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले आहे.

दशक्रिया विधी करण्यासाठी घाटाच्या ठिकाणी मयत व्यक्तीचे नातेवाईक विधी केल्यानंतर पिंडदान करतात. तेथे कावळ्याऐवजी पारव्यांचीच गर्दी होत आहे. त्याचा त्रास मयताच्या नागरिकांना होतो. शहरातील विविध सोसायटीत, सार्वजनिक ठिकाणी या कबुतरांनी उच्छाद मांडला असून, त्यांच्या त्रासामुळे चिमणी तसेच इतर पक्षी कालबाह्य झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तोच प्रकार आता दशक्रिया विधी घाटांवर कावळ्यांबाबत घडत आहे. या पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.
------------
घनकचरा विभागाचे दुर्लक्ष
पारव्यांना खाद्य देणाऱ्या नागरिकांवर घनकचरा व्यवस्थापन विभागाने कारवाई सुरू केली होती, पण ती आठवड्याभरात थांबविण्यात आली. आता शहरातील चौक, रस्त्यांवर पारव्यांना खाद्य देण्याचे प्रकार वाढले असले तरी कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.