RCB vs CSK: ५ चौकार अन् एक षटकार... १७ वर्षांच्या Ayush Mhatre ने भूवीला धुतलं, पण शतक हुकलं; तरी इतिहासात नाव कोरलं
esakal May 04, 2025 07:45 AM

शनिवारी (४ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना होत आहे. या सामन्यात बंगळुरूने चेन्नईसमोर २१४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईकडून १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेने तुफानी सुरूवात करताना मोठा विक्रमही केला आहे.

या सामन्यात आयुष आणि शेख राशिद सलामीला फलंदाजीला उतरले होते. दोघांनीही सुरुवात चांगली केली होती. चौथ्या षटकात बंगळुरूसाठी भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला. यावेळी स्ट्राईकवर आयुष होता. त्याने भूवीविरुद्ध पहिल्या तिन्ही चेंडूंवर चौकार ठोकला.

त्यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने षटकारही मारला. इतकेच नाही, तर पुढच्या दोन्ही चेंडूवर दोन चौकार ठोकले. म्हणजे भूवीच्या या एकाच षटकात ५ चौकार आणि एका षटकारासह आयुषने २६ धावा ठोकल्या. त्यानंतरही तो चांगला खेळ करत होता. दरम्यान, राशीद १४ धावांवर आणि सॅम करन ५ धावांवर बाद केले.

पण त्यानंतर आयुषला रवींद्र जडेजाची भक्कम साथ मिळाली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. या दरम्यान आयुषने २५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे अर्धशतक केले, तेव्हा त्याचे वय १७ वर्षे २९१ दिवस होते.

तो अर्धशतक करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात युवा खेळाडू ठरला. तर चेन्नईकडून आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. त्याने सुरेश रैनाला मागे टाकले. रैनाने २१ वर्ष १४८ दिवस वय असताना मुंबई इंडियन्सविरुद्ध २००८ मध्ये चेन्नईसाठी अर्धशतक केले होते.

आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक
  • १४ वर्षे ३२ दिवस - वैभव सूर्यवंशी, (राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, २०२५)

  • १७ वर्षे १७५ दिवस - रियान पराग, (राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१९)

  • १८ वर्षे २९१ दिवस - आयुष म्हात्रे, (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०२५)

  • १८ वर्षे १६९ दिवस - संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, २०१३)

  • १८ वर्षे १६९ दिवस - पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०१८)

दरम्यान, अर्धशतकानंतरही तो आक्रमक खेळत होता. पण शतकासाठी फक्त ६ धावांची गरज असताना आयुष बाद झाला. १७ व्या षटकात त्याने लुंगी एनगीडीविरुद्ध मोठा शॉट खेळताना कृणाल पांड्याच्या हातात झेल दिला. त्याने ४८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९४ धावांची खेळी केली. पण त्याच्यामुळे चेन्नई विजयाच्या जवळ पोहचले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.