Ajit Pawar On Sharad Pawar : 2019 ला शिवसेना चालते मग भाजप का नाही? काहींना पक्षाचा कार्यक्रम वाटल्यानं गैरहजेरी- अजित पवार
मुंबई : तुम्ही 2019 साली शिवसेनेसोबत गेलात, मग भाजप का चालत नाही असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवारांना विचारला. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर आपल्या सर्वच आमदारांनी सांगितलं होतं की आपण सत्तेत सामील होऊ. आम्ही काहीच वेगळा निर्णय घेतला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सतीश पाटील, गुलाबराव देवकर यासोबतच कैलास पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, “आम्ही एनडीएमधे जायचा निर्णय घेतला, त्यावरून आम्ही वेगळं काही केलं नाही. कारण 2019 साली शिवसेनेसोबत जाण्याचा आपण निर्णय घेतला. तुम्हाला शिवसेनेसोबत जायला चालतं, मग भाजप का चालत नाही? कार्यकर्त्यांना सोयीस्कररित्या सागितलं जातं.”
अजित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राची निर्मिती संघर्षातून झाली आहे. आपण आता लक्षात घ्यायला हवं की खूप बदल होत आहेत. राज्यात लाखो कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. नॅशनल हायवेची कामे सुरू आहे. फ्लायओवर, ब्रिज बांधले जात आहेत. त्यासाठी उत्तर महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. नंदुरबार, धुळे जिल्ह्यात कामे करायची आहेत. पाडळसे धरणाच काम सुरू आहे. ही मोठी कामे केवळ राज्य सरकारच्या पैशातून होत नाहीत. त्यासाठी केंद्र तसेच वर्ल्ड बँकेचा देखील पैसा लागतो. जायका 1 टक्का व्याजाने पैसा देते. ते केंद्र सरकारच्या परवानगी पैसे देते. आता तुमच्या सोबत केंद्र असायला हव ना? म्हणून आम्ही महायुती सहभागी झालो.”