शतक नाही पण शतकापेक्षा कमीही नाही, मराठमोळ्या Ayush Mhatre ने झंझावाती खेळीसह मनं जिंकली
GH News May 04, 2025 04:05 AM

अंडर 19 टीम इंडियातील वैभव सूर्यवंशीचा ओपनर पार्टनर आणि मुंबईचा मराठमोळा खेळाडू आयुष म्हात्रे याने शनिवारी 3 मे रोजी आयपीएल 2025 मधील 52 व्या सामन्यात धमाका केला. आयुष म्हात्रे याने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध झंझावाती खेळी केली. आयुषने चेन्नई विरुद्ध 214 धावांचा पाठलाग करताना 94 धावांची झंझावाती खेळी केली. आयुषचं शतक अवघ्या 6 धावांसाठी हुकलं. मात्र आयुषने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आणि आपली छाप सोडली. आयुषने या खेळीसह अनेक विक्रम केले.

ओपनर आयुषने अवघ्या 48 चेंडूत 195.83 च्या स्ट्राईक रेटने 94 धावा केल्या. आयुषने या खेळीत 5 षटकार आणि 9 चौकार लगावले. आयुषचं शतक हुकल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांना ते जिव्हारी लागलं. मात्र आयुषने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

आयुषने त्याच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिलंवहिलं अर्धशतक हे अवघ्या 25 चेंडूत पूर्ण केलं. आयुष यासह आयपीएल इतिहासात अर्धशतक करणारा तिसरा युवा फलंदाज ठरला. आयुषने यासह संजू सॅमसन याचा रेकॉर्ड ब्रेक केला. आयुषने वयाच्या 17 वर्ष 291 व्या दिवशी हे अर्धशतक झळकावलं. संजू समॅसन याने वयाच्या 18 वर्ष 169 व्या दिवशी अर्धशतक लगावलं होतं. तसेच आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम हा वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आहे. वैभवने 14 वर्ष 32 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.

आयपीएलमधील सर्वात युवा अर्धशतकवीर

  • वैभव सूर्यवंशी : 14 वर्ष 32 दिवस
  • रियान पराग : 17 वर्ष 175 दिवस
  • आयुष म्हात्रे : 17 वर्ष 291 दिवस
  • संजू सॅमसन : 18 वर्ष 169 दिवस

आयुष म्हात्रेचं विक्रमी अर्धशतक

आयुष म्हात्रेची खेळी व्यर्थ

आरसीबीने या रंगतदार झालेल्या सामन्यात चेन्नईवर शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 212 धावांचं आव्हान दिलं होतं. आयुषने केलेल्या 94 धावांच्या खेळीमुळे चेन्नईच्या विजयाच्या आशा वाढल्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणी चेन्नईचे प्रयत्न कमी पडले. चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 211 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने यासह 18 व्या मोसमातील एकूण आठवा तर चेन्नई विरुद्धचा सलग दुसरा विजय मिळवला आणि प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.