‘सिंधूचे पाणी रोखले किंवा भारताने हल्ला केल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर’, पाकिस्तानची धमकी
GH News May 04, 2025 10:07 AM

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध बिघडले आहेत. भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्याचवेळी पाकिस्तानकडून पुन्हा एकवेळा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचे पाणी थांबल्यास अण्वस्त्रांनी उत्तर दिले जाईल, असे खालिद यांनी म्हटले आहे.

रशियन टेलिव्हिजन चॅनेल ‘आरटी’शी बोलताना पाकिस्तानी राजदूत म्हणाले की, भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस संकेत आहेत. खालिद जमाली यांनी दावा केला की काही लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये पाकिस्तानच्या काही भागात हल्ला करण्याची भारताची योजना आहे. त्यामुळे भारताकडून कधीही हल्ला होऊ शकतो.

भारताकडून हल्ला झाल्यावर पाकिस्तान पूर्ण ताकदीने उत्तर देणार असल्याचे जमील यांनी सांगितले. ते म्हणाले, युद्ध झाल्यास आम्ही आमच्याकडे असलेले अण्वस्त्रसुद्धा वापरणार आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवल्यास त्याला एक्ट ऑफ वॉर (युद्धची कारवाई) समजून पूर्ण ताकदीने उत्तर देणार आहे. दोन्ही देश अण्वस्त्रांनी संपन्न आहे. यामुळे त्यांच्यात असलेला तणाव कमी करण्याची गरज आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याची तटस्थ आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्याची गरज आहे. त्या चौकशीत चीन आणि रशियाचा समावेश केला जावा.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांनी यापूर्वी अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली होती. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत, त्यामुळे कोणीही पाकिस्तानवर सहज हल्ला करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले होते. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी आमच्याकडे शाहीन, गौरी, गझनवी आदी १३० अण्वस्त्रे भारतासाठीच ठेवली असल्याचे बेताल वक्तव्य केले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताविरोधात अनेक पावले उचलली आहे. सिंधू पाणी करार संपवला आहे. तसेच दोन्ही देशांच्या आयात-निर्यातीवर बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला कारवाई करण्याची खुली सूट दिली आहे. तसेच दहशतवादी आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.