नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारताने आता त्या देशासोबतच्या सर्व प्रकारच्या व्यापारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानातून कोणतीही आयात होणार नाही; तसेच पाकिस्तानलाही भारताकडून काहीही निर्यात केले जाणार नाही. पाकिस्तानी जहाजांसाठी भारतीय बंदरांची दारेही बंद झाली असून डाक आणि पार्सल सेवेला ब्रेक लावण्यात आला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली असून दहशतवादाला पाकिस्तानकडून खतपाणी घातले जात असल्याने त्याच्याविरुद्ध निर्णायक कारवाईची मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर वाणिज्य मंत्रालयाने केलेल्या घोषणेत म्हटले आहे की पाकिस्तानशी सर्व प्रकारच्या आयात निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अप्रत्यक्ष सुरू असलेला व्यापारही थांबविण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानसोबतच्या सर्व श्रेणींतील पार्सल आणि डाक सेवेलाही ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. डाक विभागाकडून आज याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. भारताने यापूर्वीच पाकिस्तानसोबतचा थेट व्यापार बंद केला होता. पण आता सरकारने सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष व्यापार देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाबाबत वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी (ता. २) एक अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानमधून प्रामुख्याने औषध उत्पादने, फळे आणि तेलबियांची आयात केली जाते. पुलवामा हल्ल्यानंतर (२०१९) भारताने पाकिस्तानी उत्पादनांवर २०० टक्के कर आकारला होता. तेव्हापासून पाकिस्तानी आयात कमी झाली होती.
भारतीय बंदरांची दारे बंद
भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, पाकिस्तानी विमानांना भारताने याआधीच आपली हवाई हद्द बंद केली होती. आता भारताने १९५८ च्या व्यापारी शिपिंग कायद्यांतर्गत पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. भारतीय सागरी मालमत्ता, मालवाहू आणि बंदर पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू झाला आहे. या निर्णयानंतर, कोणतेही पाकिस्तानी जहाज भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करू शकणार नाही.
‘अब्दाली’ची चाचणी
पाकिस्तानने शनिवारी ‘अब्दाली’ या शस्त्रप्रणालीची चाचणी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र साडेचारशे किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. यामध्ये अत्याधुनिक दिशादर्शन प्रणालीचा समावेश आहे.
हल्ल्याची धमकी
पाकिस्तानच्या वाट्याला येणारे सिंधू नदीचे पाणी भारताने वळविण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही हल्ला करू अशी धमकी पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. सिंधूचे पाणी रोखण्यासाठी भारताने कोणतेही धरण उभारले तर आम्ही ते पाडू असेही त्यांनी म्हटले आहे.
शस्त्रनिर्मिती थांबता कामा नये
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जबलपूर आणि चंद्रपूर येथील आयुध निर्माण कारखान्यातील कामगारांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून शस्त्रनिर्मितीचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबता कामा नये अशी सूचना करण्यात आली आहे.
मोदींच्या भेटीस उमर अब्दुल्ला
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या ‘७ - लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास पाच ते सात मिनिटांच्या या भेटीत जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चर्चा झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अब्दुल्ला यांच्या पाठोपाठ नौदलाच्या प्रमुखांनीही मोदी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.
पाकचीच निकड अधिक
भारताच्या जागतिक स्तरावरील व्यापाराशी तुलना केली असता त्यात पाकिस्तानचा वाटा हा केवळ ०.१ टक्के आहे. भारताला पाकिस्तानकडून फारसे काही आयात करावे लागत नाही पण पाकिस्तान मात्र बऱ्याच बाबतीत भारतावर अवलंबून आहे.
असाही व्यापार(आर्थिक वर्ष २०२४- २५) (प्रमाण दशलक्ष डॉलरमध्ये)
पाकिस्तानला निर्यात- ४४७.६५
पाकिस्तानकडून आयात - ०.४२
आर्थिक वर्ष (२०२३-२४)
निर्यात - १.१८ अब्ज डॉलर
आयात - २.८८ दशलक्ष डॉल