शिकवण झाडांची
esakal May 04, 2025 11:45 AM

ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com

प्रत्येक पक्षी वेगळा, प्रत्येक झाड वेगळं आणि एकेका झाडाचं प्रत्येक पान आणि फूलही स्वतःचं वेगळेपण जपणारं! कुणाची ही किमया? त्याला निसर्ग म्हणा, देव म्हणा, परमात्मा म्हणा तो किमयागार खरा! त्याच्या चरणी आपण वाहतो ती त्यानेच निर्माण केलेली फुलं, फळं आणि पानं. त्यानेही तो प्रसन्न होतो ही आपली निर्मळ भावना. फक्त जे वाहू ते मनोभावे असावं.

अलीकडेच एका टळटळीत दुपारी मिटिंग संपवून बाहेर पडले. कॅब बुक केली; पण ती यायला वेळ होता. उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या. समोर पाहिलं, तर चक्क पार दिसला. वडाच्या झाडानं सावलीही धरली होती आणि नारळपाण्याची गाडीही. भरउन्हात अगदी स्वर्गसुख वाटलं ते. शहाळं घेत असताना एक वाऱ्याची झुळूकही सुखावून गेली. त्या जागेचा निरोप घेताना त्या झाडाचे मनोमन आभार मानले मी. आणि जणू त्याला प्रतिसाद यावा तशी झाडाची पानंही सळसळली. कॅबमध्ये बसल्यावर विचारांनाही आपोआपच गती मिळाली आणि नेहमी एका जागी उभ्या राहणाऱ्या झाडांनी जणू माझ्याभोवती फेर धरला.

वड, पिंपळ, आंबा ही सगळी छान सावली देणारी झाडं. शहरामध्ये राहात असूनही या गारव्याचा बऱ्यापैकी अनुभव घेता आला. आता वड म्हटल्यावर वटपौर्णिमा आठवतेच; पण पारंब्यांचा स्पर्शही आठवतो. पावसाळ्यात या पारंब्यांना कोवळे मोड फुटले की ते खुडून तेलात उकळले, की हे तेल केसांना गुणकारी ठरतं. आर्यला लहान असताना सांगितलं, की हे तेल लावलं की केसही पारंब्यांसारखे होतात. अर्थात मजबूत होतात अशा अर्थानं म्हणाले मी; पण शब्दशः डोळ्यासमोर आणून हा कितीतरी वेळ हसत बसला होता. पारंब्यांना झोका घेण्याचा आणि तेलाची सामग्री गोळा करण्याचा उद्योग त्याला आजही आवडतो. धारेश्वराच्या मंदिर परिसरात आजही वडपिंपळाचे असे डेरेदार वृक्ष आहेत आणि तिथे अखंडपणे पाखरांचा किलबिलाट चालू असतो.

पिंपळपान जाळी पाडून वहीत ठेवण्यासाठी प्रसिद्धच. आठवणींचं प्रतीक. खरंच हे वृक्ष कित्येक पिढ्या पाहात असतील. एक छोटी गोष्ट वाचनात आली होती. एक आजोबा आंब्याच्या रोपाला पाणी घालत असतात. त्यांचं वय पाहून एक तरुण मुलगा सरळ विचारतो, ‘‘आजोबा याला आंबे येणार कधी आणि तुम्ही खाणार कधी?’’ यावर ते आजोबा म्हणतात - ‘‘अरे बाळा, मी माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडाची फळं खाल्ली. याची फळं पुढच्या पिढ्या खातील. पुढच्या पिढीसाठी पेरायचं असतं,’’ हा विचार आजोबा त्या मुलाच्या मनात पेरून गेले ते एका रोपट्याच्या निमित्ताने!

झाडं अशीच न बोलता खूप काही शिकवत असतात. वसंतात कोवळी पालवी फुटणार, मग पानं हिरवी होत जाणार आणि शेवटी पिकून गळून पडणार; पण पुन्हा नवी पालवी झाडावर येतेच. माणसाच्या संपूर्ण आयुष्याचं वास्तव झाडाची पानं वर्षभरात दाखवून देतात. कधी निष्पर्ण वृक्षासारखं होत्याचं नव्हतं होऊ शकतं; पण नवा पर्णसंभार त्याच आयुष्यात नव्याने अनुभवता येतो.

त्याचबरोबर ती ती फुलं-फळं यायला विशिष्ट ऋतू यावा लागतो. आपल्या आयुष्यातही प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. जसा, आंब्याला मोहोर यायला वसंतच यावा लागतो. आयुष्यातही प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. वाट पाहावी लागते. झाडं आपल्याला वाट पाहायला शिकवतात. कबीरजींचा दोहा आहे.

‘धीरे धीरे रे मना धीरे सबकुछ होय। माली सींचे सौ घडा, ऋतु आए फल होय॥’

फळं फुलं लवकर येण्यासाठी तुम्ही नुसतं पाणीच ओतत राहिलात, तरी ते झाड त्या त्या ऋतूतच बहरणार. उलट पाण्याचा अतिरेकही अपाय करू शकतो.

असाच थंडीचा ऋतू बोरांचा. ताथवड्याचं बोरांचं झाड हे एक आकर्षण होतंच. बोरं वेचण्यात आणि नंतर ती खाण्यात किती वेळ जायचा कळायचंही नाही. तिथे चिंचा आणि चिकूचीही झाडं होती; पण पाडणं आणि तोडणं यापेक्षा वेचणं आवडतं मला. मग ते बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात लहानपणी बकुळीची फुलं वेचणं असो किंवा सदाशिव पेठेतील एका गल्लीत लालबुंद गुंजा.

प्राजक्ताचा अंगणभर पडलेला सडा असाच नेत्रसुखद असतो आणि एकेका फुलाचा स्पर्शही तेवढाच सात्त्विक भासतो. एका सकाळी असेच शब्द सुचले होते.

आकाशीचा सूर्य दिसे हा आरक्त

प्रकाशात न्हाऊनी तेजाळला प्राजक्त

अशोकाच्या झाडाची पानंही कशी चकचकीत दिसतात. अशोकाच्या पानाची पर्स ही कलाकृती अनेकांनी करून पाहिली असेल. काजू, फणस, आंबा, कोकम, नारळ ही नावं घेतली की मन थेट कोकण गाठतं आणि खरेखुरे प्रवासाला निघालो, की एरवी स्थिर असणारी झाडं चक्क मागे मागे पळू लागतात. ‘पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया’ काय छान लिहिलंय ना गदिमांनी!

अशी सगळी झाडं आपण तर पाहात असतोच; पण कवी, सुभाषितकार आणि अर्थातच संतमंडळी यांची दृष्टी काही वेगळीच. आता सगळीच झाडं काही सावली देत नाहीत आणि उंचच उंच वाढतात. अशाच खजुराच्या झाडावरून कबीरजी माणसाच्या वृत्तीवर नेमकं बोट ठेवतात.

‘बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर। पंथि को छाया नही फल लागे अतिदूर॥’ खजुरासारखं मोठं होण्याचा काय उपयोग? वाटसरूला ना त्याची सावली मिळते, ना फळं हाताशी येतात.

मोठ्या पदावर जायचं नि भ्रष्टाचार करायचा, पैसा मिळवायचा नि उधळायचा, उच्च शिक्षित होऊन अरेरावी करायची अशी वृत्ती आपण अनेकदा पाहतो; पण पैसा, शिक्षण, पद या गोष्टीतून समाजाचं भलं झालं, तर त्याचा खरा उपयोग आहे.

सुभाषितकारांनीही झाडांचं उदाहरण खूप नेमकेपणानं वापरलंय. अगदी दृष्टीस पडणारी साधी गोष्ट; पण बोध किती छान करून देतात पाहा. फळं लगडली, की त्या ओझ्याने झाडं वाकतात. तशीच खरी ज्ञानी माणसं ही नम्र होतात. खरंच आहे, जितकं ज्ञान होत जाईल तितका त्या विषयाच्या खोलीचा अंदाज, व्याप्तीचा अंदाज येतो आणि ही तर सुरुवात आहे याची जाणीव होऊन माणूस नम्र होतो. उलट अर्धज्ञानीच अहंकारी दिसतात.

असंच चंदनाचं खोड त्याच्यावर घाव घालणाऱ्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही सुगंधित करतं. हा दृष्टान्त अर्थातच सुभाषितकार संतसज्जनांसाठी देतात. जशी माऊली छळवणूक करणाऱ्या समाजाबद्दल कोणतीही कटुता न ठेवता ज्ञानेश्वरी सांगून गेली आणि या विश्वासाठी पसायदान मागून गेली! संत हे तर खरे कल्पतरू.

याच संतपरंपरेचा कळस असलेले तुकाराम महाराजांचा अभंगही आठवतोच. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती’ पक्ष्यांना तर या झाडांचा किती आधार असतो. एकेका वृक्षावर किती पक्ष्यांचे संसार थाटले जातात. ‘झोका झाडाले टांगला’ असं म्हणत सुगरणीच्या खोप्याचं बहिणाबाई काय सुंदर वर्णन करतात.

प्रत्येक पक्षी वेगळा, प्रत्येक झाड वेगळं आणि एकेका झाडाचं प्रत्येक पान आणि फूलही स्वतःचं वेगळेपण जपणारं! कुणाची ही किमया? त्याला निसर्ग म्हणा, देव म्हणा, परमात्मा म्हणा तो किमयागार खरा! त्याच्या चरणी आपण वाहतो ती त्यानेच निर्माण केलेली फुलं, फळं आणि पानं. त्यानेही तो प्रसन्न होतो ही आपली निर्मळ भावना. फक्त जे वाहू ते मनोभावे असावं. एक ओवी आठवली -

‘विठ्ठलाला तुळस गणपतीला दुर्वा। शंकराला बेल शोभतो हिरवा॥’ ही जशी पूजेची सामग्री तशाच या गुणकारी वनस्पती. घरासमोर आता तुळशी वृंदावन नसलं, तरी तुळशीची कुंडी असते. अनेकांनी प्रेमाने आपली बागही फुलवलेली असते. कुणी खिडकीत, गॅलरीत, गच्चीत किंवा मोठ्या आवारात. ही झाडं कसलीच तक्रार करत नाहीत. काही मागत नाहीत. ती निरपेक्ष असतात. देत राहतात; पण आपण प्रेम दिलं, की नक्कीच फुलतात आणि झुलतात. हे नातं खरंच बहरायला हवं. झाडांनी झुलायला हवं. पक्ष्यांनी किलबिलावं, खारोट्यांनी बागडावं. या सृष्टीनं सुजलाम् सुफलाम् व्हावं. ही मनोमन प्रार्थना! आणि हो - ‘झाडं मातीला घट्ट धरून आकाशाकडे झेपावतात, ऊन- वारा- पाऊसही झेलतात, पंचतत्त्वांना अशी धरून राहणारी ही झाडं. आपल्या सर्वांच्या स्वप्नरूपी रोपाचाही असाच डेरेदार वृक्ष व्हावा आणि त्याला बांधलेला झोकाही उंच आभाळी जावा, तो पाय जमिनीवर ठेवूनच. यापेक्षा सुंदर मागणं ते काय. शुभं भवतु.

(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.