मुलांचं स्वत:चं स्वयंपाकघर!
esakal May 04, 2025 11:45 AM

- स्मिता देव, smitah37@gmail.com

आपण जेव्हा घरी असतो, जेवण, चहा-नाश्ता, सर्व विनासायास मिळत असतं, तेव्हा त्याचं महत्त्व विशेष जाणवत नाही! ती किंमत पुष्कळदा बाहेर एकटं राहायला लागल्यावर कळते. किती दिवस खाणावळी, रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये खाणार?... शिवाय सगळ्या गोष्टींचे खर्च वाढलेले असतात. स्वयंपाकघरात जबाबदारी घेऊन काही करण्याची अनेक मुलामुलींची ही पहिलीच वेळ असते.

खूप तरूण मुलामुलींना शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहावं लागतं. आणखी चांगल्या आयुष्याची महत्त्वाकांक्षा बाळगून, आपलं गाव सोडून मुलं मोठ्या शहरात जातात, परदेशातही जातात. त्यासाठी नुसतं घर सोडावं लागतं असं नाही; ‘कम्फर्ट झोन’च सोडावा लागतो. नव्या ठिकाणी दैनंदिनीची घडी बसवण्याच्या प्रयत्नांत सगळ्यांत मोठा प्रश्न असतो खाण्यापिण्याचा.

घरगुती अन्न मिळणं बंद होतं. अशा वेळी आपण जे खातो ते आरोग्याला फारसं चांगलं नसतं. शिवाय खिसा-पाकिटाला भगदाड पडलेलं असतंच. अनेकांना स्थलांतरानंतर अन्नपचनाची काही ना काही समस्या सुरू होते, वजन वाढतं किंवा कमी होतं...

माझ्या मुलानं- युगनं उच्च शिक्षणासाठी लंडनच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आपलं आपण, स्वतंत्र राहायच्या कल्पनेनं तो फार उत्साहात होता. नवीन अभ्यास, नवं ठिकाण, छान परदेशी खाद्यपदार्थ, यांची मनोराज्यं करत होता! त्याला भाड्याने घरही लगेच मिळालं.

माझ्या काही मित्रमैत्रिणींनी मला सांगितलं होतं, की त्याला काही ठरावीक भांडी इथूनच दे- जेवणाची ताटली, चमचा, काटा, सुरी, ग्लास, चहा-कॉफीचा मग आणि प्रेशर कुकर! तेव्हा मला वाटलं, ‘अहो, तो शिकायला चाललाय; स्वयंपाकाचे धडे घ्यायला नाही!’ तिकडे ‘टेस्को’ वगैरेंसारख्या भव्य दुकानांमध्ये विद्यार्थ्यांना खास दरांत वस्तू मिळतात.

मग इथून कशाला उगाच हे सामान पाठवा... असं म्हणून मी भांड्यांच्या यादीकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर सांगण्यासाठी मनात माझी माझी एक यादी तयार करून ठेवली. त्याचा पहिला आठवडा सामानाच्या आवराआवरीत, वस्तू जिथल्या तिथे लावण्यात गेला. त्यानं घरी काही खायला केलंच नाही. स्थानिक इंग्लिश पदार्थ अप्रूपाचे वाटत असल्यामुळे त्यांचा आस्वाद घेण्यातच त्याला मजा येत होती.

पण दहा दिवस गेले आणि एका संध्याकाळी त्याचा फोन आला... ‘माँ, मला वाटतं आता स्वयंपाक घरीच करायला हवा. माझा खर्च ‘बजेट’च्या बाहेर चाललाय...’ आणि खरं सांगू... जणू याच फोनची अपेक्षा होती इतका मला आनंद झाला!

‘चल, घे आता लिहून!’ म्हणत मी त्याला एक-एक वस्तू सांगायला सुरूवात केली... रसभाज्या, करीज्, डाळ वा आमटी, भात, पास्ता, हे सगळे पदार्थ करता येतील अशी दोन पातेली हवीत. एक छोटा बुलेट ग्राइंडर, ब्रेकफास्टला अंड्यांचे पदार्थ करण्यासाठी एक स्किलेट पॅन, दुसरा एक पॅन भाज्या, सॉसेज वगैरे परतायला (त्यातच डोसे-धिरडी करता येतात).

पाणी गरम करण्याची इलेक्ट्रिक किटली, भाज्या धुवायला चाळणी (कॉलंडर), चहाची गाळणी, स्वयंपाकाचे डाव आणि चमच्यांचा सेट, खाण्याचे चमचे डझनभर (लहान आणि मोठे), काटे आणि जेवताना वापरायच्या सुऱ्या, भाज्या चिरायला कटिंग बोर्ड आणि सुरी, ही प्राथमिक भांडी हवी. नुसता स्वयंपाक करून काम होत नाही. नंतर भांडी घासायची असतात, ओटा आवरायचा असतो... अर्थातच भांडी घासायचं डिटर्जंट, घासणी, ओटा पुसायला स्पॉन्ज, किचन नॅपकिन्स आणि हातपुसणी हवीतच.

नंतरचा प्रश्न वाणसामाचा... दोन तरी मध्यम आकाराचे डबे हवेत. एकात तांदूळ ठेवायचे आणि दुसऱ्यात तूरडाळ किंवा मूगडाळ. मसाल्यांत मीठ, काळी मिरी, तिखट, हळद, हे ‘बेसिक’ हवंच. शेंगदाण्याचं तेल, खोबऱ्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल. मग बटर, जॅम, ब्रेड ताजा आणायचा.

चहा, कॉफी. मी त्याला सांगितलं, की फ्रिजमध्ये मिश्र फ्रोजन भाज्यांची पाकिटं, कांदे, बटाटे, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर नेहमी ठेव. पण एका वेळी कोणतीही गोष्ट जास्त घेऊन ठेवायची नाही; थोडं थोडंच घेऊन यायचं, म्हणजे फुकट नको जायला. हे सर्व साहित्य एका माणसाच्या स्वयंपाकघरात सुरूवातीला पुष्कळ आहे.

त्याला आधीपासून अंड्याचे पदार्थ आणि टोस्ट हा ब्रेकफास्ट मेन्यु करता येत होता. हळूहळू तो भात लावायला, भाज्या घालून खिचडी करायला शिकला. दोन-तीन महिन्यांत घरच्या भारतीय अन्नाची आणखी आठवण यायला लागली, मग मी त्याला आपल्या काही ‘बेसिक’ ग्रेव्ही कशा करायच्या ते सांगितलं. एका वेळेला जास्त ग्रेव्ही वा वाटण करून फ्रिजमध्ये साठवून ठेवायचं. पुन्हा करताना त्यात फ्रोजन भाज्या किंवा चिकन घातलं, की रस्सा लवकर होतो.

कितीतरी मुलं अशी शहरात किंवा परदेशात काही ना काही कारणानं जात असतील आणि त्यांच्या आई त्यांना अशीच तयारी करायला सांगत असतील! हा लेख वाचून त्यांना आणखी काही कल्पना नक्की नव्यानं सुचतील. स्वयंपाकघरातील नवोदितांसाठी धावपळ असताना उपयोगी पडेल अशी वाटण आणि ग्रेव्हीची रेसिपी आज सांगते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.