RCB vs CSK: राडा! अंपायरने ब्रेव्हिसला आऊट दिलं, जडेजाने वादही घातला; पण तरी DRS का नाकारला? जाणून घ्या कारण
esakal May 04, 2025 11:45 AM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (३ मे) चेन्नई सुपर किंग्सला एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात केवळ २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा चेन्नईचा नववा पराभव ठरला.

तथापि, या सामन्यात एक वादग्रस्त घटना घडली, ज्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. चेन्नईचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून हा वाद झाला.

झाले असे की या सामन्यात बंगळुरूने चेन्नईसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला चांगली सुरुवात मिळाली होती चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि आयुष म्हात्रे यांच्यात शतकी भागीदारी झाली होती. त्यामुळे चेन्नई विजयाच्या जवळ होते.

पण आयुष १७ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लुंगी एनगीडीच्या गोलंदाजीवर ९४ धावांवर बाद झाला. त्याच्या पुढच्या चेंडूवर फलंदाजीसाठी फॉर्ममध्ये असलेला डेवाल्ड ब्रेव्हिस उतरला.

ब्रेव्हिसने पहिलाच चेंडू खेळत असताना एनगीडीने त्याला फुटटॉस टाकला. पण ब्रेव्हिसला तो चेंडू मारता आला नाही आणि तो चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यानंतर बंगळुरूच्या अपीलवर अंपायर नितीन मेनन यांनी फार विचार न करता लगेचच ब्रेव्हिसला बाद दिले.

त्यानंतर ब्रेव्हिसने जडेजासोबत धावून धाव काढण्याचा प्रयत्न केला आणि मग त्याच्याशी काही क्षण चर्चा केल्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र नितीन मेनन यांनी सांगितले की डीआरएस घेण्यासाठीचे १५ सेकंद संपले आहेत. त्यामुळे त्यांनी ब्रेव्हिसला माघारी जाण्यास सांगितले.

मात्र झाले असे की १५ सेकंदाचा कालावधी मैदानातील मोठ्या स्क्रिनवरही दाखवण्यात आला नाही. जडेजाने ब्रेव्हिसशी बोलताना वेळ पाण्यासाठी स्क्रिनवर पाहिले होते. पण त्यावेळी टायमर दाखवण्यात आला नव्हता. तथापि, अंपायरने ब्रेव्हिसला बाद दिल्यानंतर जडेजा अंपायर्ससोबत वाद घालतानाही दिसला.

दरम्यान, ब्रेव्हिसने जडेजाशी बोलल्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला होता, यात वेळ गेल्याने त्याला पहिल्याच चेंडूवर शून्यावर माघारी जावे लागले.

मात्र, जेव्हा रिप्ले पाहण्यात आला, त्यावेळी दिसले की चेंडू अगदी पाचवा स्टम्पच्या बाहेर जात आहे. तसेच इम्पॅक्टही अंपायर्स कॉल होता. म्हणजेच स्टम्पच्या बाहेरून जात असल्याने तो नाबाद असल्याचे दिसले. परंतु, त्याला तोपर्यंत बाद दिले होते आणि त्याला डीआरएसही नाकारला होता. त्यामुळे त्याला बाद होऊन माघारी परतावे लागले होते.

तथापि, यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्माने टायमरवर शून्य सेकंद दाखवत असताना डीआरएस घेतला होता आणि त्याची डीआरएस मागणी अंपायर्सकडून मान्य करण्यात आली होती. पण यावेळी टायमरच न दाखवल्याने वाद आणखी वाढले आहेत.

१५ सेकंद कसे संपले?

सामन्यानंतर अनुभवी अंपायर अनिल चौधरी यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना १५ सेकंदांबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की ज्याक्षणी फलंदाजाला बाद देण्यात आले, त्याचक्षणी चेंडू 'डेड' समजला जातो (चेंडू पूर्ण झाला). त्यावेळी त्यावेळी धावांसाठी पळण्याची गरज नव्हती. कारण त्या धावा वैध धरल्या जातच नाही.

ज्याक्षणी चेंडू डेड होतो, तेव्हापासून टायमर सुरू होतो. जरी डीआरएसनंतर नाबाद देण्यात आले असते, तरी त्या धावा वैध धरल्याच गेल्या नसत्या. त्यामुळे पळण्यात ब्रेव्हिसचा वेळ गेला आणि त्यानंतर त्याने जडेजाशी चर्चा केली. त्यामुळे त्याचे १५ सेकंद संपले.

दरम्यान, चेन्नईसाठी ही विकेट महागात पडली. कारण ब्रेव्हिस चांगल्या फॉर्ममध्ये होता. तो बाद झाला तेव्हा चेन्नईला २१ चेंडूत ४२ धावांची गरज होती. त्यानंतर एमएस धोनी फलंदाजीला आला. जडेजा आणि धोनी यांनी सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला.

पण शेवटच्या षटकात १५ धावांची गरज असताना तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला. त्यानंतर नोबॉलवर षटकार खेचत शिवम दुबेने आशा उंचावल्या. पण यश दयालने शेवटचे तीन चेंडू अत्यंत चांगले टाकताना चेन्नईला विजयापासून दूर ठेवले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.