Yeola News : कांदा १५२ रुपये; संतापात शेळ्यांपुढे टाकला
esakal May 04, 2025 05:45 PM

येवला- नाफेडची कांदा खरेदी करण्यासह निर्यातशुल्क हटविल्याच्या घोषणा झाल्या असल्या तरी वास्तवात उन्हाळ कांद्याच्या भावात मात्र वाढ न होता घट सुरू आहे. सातत्याने भावात घसरण होऊन ८०० ते ९०० रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळत आहे. येथे शनिवारी (ता. ३) गोल्टी कांद्याला केवळ १५२ रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाल्याने राजापूर येथील शेतकऱ्याने संतापून कांदा घरी नेऊन शेळ्यांपुढे टाकत संताप व्यक्त केला.

उन्हाळ कांद्याचे पीक बाजारात विक्रीला येऊ लागताच कांद्याच्या भावाने गटांगळ्या खायला सुरुवात केली आहे. इतर राज्यांतील उत्पादन व मागणीत तफावत असल्याने दरात सातत्याने होत असलेली घट शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करायला लावणारी ठरत आहे.

मागील आठवड्यापासून ८०० ते हजार रुपयांदरम्यान सरासरी भाव कांद्याला मिळत आहे. शनिवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाला. आजच्या कांद्याच्या लिलावात गोल्टी कांद्याला १५२ रुपये प्रतिक्विंटल इतक्या नीचांकी पातळीवर पुकारले गेल्याने शेतकऱ्याने शेळ्यांपुढेच कांदा टाकत संताप व्यक्त केला.

राजापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी बापू पांडुरंग विंचू यांनी सात ते आठ क्विंटल कांद्यातील गोल्टी कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला १५२ रुपये प्रतिक्विंटल इतका नीचांकी बाजारभाव मिळाल्याने उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही यातून न मिळाल्याने नाराज झालेल्या बापू विंचू या शेतकऱ्याने आपला कांदे परत घरी नेत शेळ्यांपुढे टाकून संताप व्यक्त केला. दरम्यान, आज येवला बाजार समितीत गावरान कांद्याला २०० ते १३६९, तर सरासरी ९०० रुपये भाव मिळाला, तर उपबाजार अंदरसूल येथे ३०० ते १२२६, तर सरासरी ९०० रुपये भाव मिळाला.

काबाडकष्ट करून पिकविलेल्या कांद्याला मातीमोल मिळत असेल तर शेती करावी की नाही, हा प्रश्न पडतो. शेतमाल विकून मजुरी आणि भांडवल दूरच वाहतूक खर्चही निघणार नसल्याने आज कांदा घरी नेऊन शेळ्यांना खाऊ घातला.

-बापू पांडुरंग विंचू, कांदा उत्पादक शेतकरी, राजापूर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.