पंजाब किंग्सचा स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याला दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर व्हावं लागलं. त्यानंतर अखेर अनेक दिवसांनी टीम मॅनजमेंटकडून ग्लेन मॅक्सवेल याच्या जागी बदली खेळाडूला संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू सध्या पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत आहेत. या खेळाडूने गेल्या काही महिन्यांत टी 20 क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र त्या खेळाडूने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. तो खेळाडू नक्की कोण आहे? हे जाणून घेऊयात.
पंजाब किंग्स टीमने ग्लेन मॅक्सवेल याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड ऑलराउंडर मिचेल ओवन याच समावेश केला आहे. मिचेल ओवन सध्या पीएसएलमध्ये पेशावर जाल्मी टीमकडून खेळत आहे. बाबर आझम या संघाचं नेतृत्व करत आहे. पेशावर जाल्मी टीमने या हंगामात आतापर्यंत एकूण 7 सामने खेळले आहेत. ओवन या सातही सामन्यात प्लेइंग ईलेव्हनचा भाग होता. मिचेल पीएसएल संपल्यानंतर पंजाब टीमसह जोडला जाणार आहे. पीएसएल फायनल 18 मे रोजी होणार आहे. त्यामुळे मिचेल पंजाबसाठी प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध असेल. मात्र अजून पंजाबचं प्लेऑफचं तिकीट निश्चित झालेलं नाही.
मिचेल ओवन याने आतापर्यंत 34 टी 20 सामने खेळले आहेत. मिचने या 34 सामन्यांमध्ये 25.84 च्या सरासरीने 646 धावा केल्या. मिचेलने या दरम्यान 2 शतकं लगावली. तसेच मिचेलने 10 विकेट्सही घेतल्या. पंजाबने मिचेलसाठी 3 कोटी रुपये मोजले आहेत.
मिचेल ओवन याला संधी
ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेच्या बीबीएल अर्थात बीग बॅश लीग स्पर्धेचं विजेतेपद या वर्षी होबार्ट हेरीकेन्स टीमने पटकावलं होतं. होबार्ट हेरीकेन्सची ट्रॉफी जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली. मिचेलने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मिचेलने तेव्हा 257 च्या स्ट्राईक रेटने 42 बॉलमध्ये 108 रन्सची स्फोटक खेळी केली होती. मिचेलने या डावात 10 षटकार आणि 5 चौकार लगावले होते. सिडनीने अंतिम सामन्यात होबार्ट हेरीकेन्ससमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. होबार्टने हे आव्हान मिचेलच्या शतकी खेळीच्या जोरावर 14.1 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं होतं. मिचेलने या हंगामातील एकूण 11 डावांमध्ये 45 सरासरीने आणि 203 च्या स्ट्राईक रेटने 452 धावा केल्या होत्या.