व्हॅटिकन सिटी : पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता नव्या पोपच्या निवडीची तयारी व्हॅटिकनमध्ये सुरू झाली आहे. येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सिस्टिन चॅपलच्या छतावर शुक्रवारी (ता.३) चिमणी उभारली.
पोप निवडीसाठी सिस्टिन चॅपलमध्ये ‘कॉनक्लेव्ह’ जमणार आहे. तेथे होणाऱ्या मतदानातील प्रत्येक दोन टप्प्यानंतर सर्व कार्डिनलच्या मतपत्रिका एका विशेष भट्टीत जाळल्या जातात. त्यातून निघणाऱ्या धुरातून पोप फ्रान्सिस यांच्या उत्तराधिकारी निवडीची माहिती समजेल.
कार्डिनलपैकी कोण पोप पदाच्या शर्यतीत आहे, यावर नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. येत्या बुधवारी (ता.७) होणाऱ्या ‘कॉनक्लेव्ह’च्या तयारीचा व्हिडिओ ‘द होली सी’ या रोमन कॅथॉलिक चर्चची केंद्रीय प्रशासकीय संस्थेने शनिवारी प्रसारित केला आहे. यामध्ये चिमणी उभारणे, सिस्टिन चॅपलमधील अन्य तयारीचे चित्रण दिसते. कार्डिनल यांना बसण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी लाकडी टेबल मांडण्यात आले आहेत.