Congress Rally : परभणी : भक्त प्रल्हादाची जशी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेसजनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. पण, दुसरीकडे रावणाचा छळणारा विचार आहे, तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे असे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंह अवतार झाला तसाच एखादा अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून समोर येईल राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. सामाजिक सलोखा तसेच सद्भाव वाढीस लागावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत रविवारी सद्भावना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री नितीन राऊत, काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (new avatar will destroy the demonic BJP’s divisiveness, says congress state president harshvardhan sapkal)
सकाळी पोखर्णी येथे नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम होत आहे. परभणीतही अशाच एका घटनेने या भागात सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रकार झाला. राज्यातील सामाजिक तणाव कमी करण्याच्या हेतूने आणि सद्भावना तसेच सौहार्द निर्माण करण्यासाठी ही काँग्रेस पक्षाने सद्भावना पदयात्रा आयोजित केली आहे. याआधी बीड जिल्ह्यात मस्साजोग ते बीड, नागपूर आणि नाशिकमध्ये सद्भावना पदयात्रा काढण्यात आली तर काल परळीत सद्भावना सत्याग्रह करण्यात आला आणि आज परभणीत सद्भावना यात्रा काढली आहे.
हेही वाचा – Tel Aviv Attacked By Houthi : इस्रायलला जाणारं एअर इंडियाचं विमान वळवलं; तेल अवीवजवळ क्षेपणास्त्र हल्ला
यावेळी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, सत्ताधारी लोक राजकीय फायद्यासाठी सामाजिक वातावरण बिघडवत असताना काँग्रेस पक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्त्वाखाली सद्भावना आणि सौहार्द वाढवण्याचे काम करत आहे. जनतेला लुबाडून उद्योगपती आणि ठेकेदारांची घरे भरण्याचे काम सुरू आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी शक्तीपीठ महामार्गाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी हडपण्याचा सरकारी डाव आहे पण काँग्रेस तो यशस्वी होऊ देणार नाही.
सद्भावना यात्रेच्या सकाळच्या सत्रात 8 किलोमीटर तर दुपारच्या सत्रात 8 किलोमिटर पदयात्रेचा कार्यक्रम असून संध्याकाळी माहेर मंगल कार्यालय येथे मुक्काम होईल. उद्या सोमवार, 5 मे रोजी परभणी शहरात महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान बचाव यात्रा व संविधान संमेलन संपन्न होणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूनंतर पुकारलेल्या आंदोलनात मृत्यू झालेले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.