इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सला रविवारी (४ मे) पंजाब किंग्सविरुद्ध ३७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
रिषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या हा ११ सामन्यांतील ६ वा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आता प्लेऑफमध्ये पोहचण्याचा मार्ग कठीण झाला आहे. दरम्यान, लखनौला या सामन्यात रिषभ पंतच्या अपयशाचीही चिंता सतावत आहे.
लखनौने २७ कोटी रुपयांना खरेदी केलेला पहिल्या सामन्यापासून आत्तापर्यंत फार फॉर्ममध्ये दिसलेला नाही. त्याला एकदाच अर्धशतक करता आले आहे. रविवारी झालेल्या सामन्यातही तो फार काही करू शकला नाही. या सामन्यात पंजाब किंग्सने २३७ धावांचे लक्ष्य लखनौसमोर ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला अर्शदीप सिंगने पहिल्या ५ षटकातच मोठे धक्के दिले होते. त्याने एडेन मार्कराम (१३), मिचेल मार्श (०), निकोलस पूरन (६) या तिघांना झटपट बाद केले. त्यामुळे डाव सावरण्याची जबाबदारी रिषभ पंत आणि आयुष बडोनीवर होती. ते डाव सावरतही होते.
पण आठव्या षटकात अझमतुल्ला ओमरझाईच्या ५ व्या चेंडूवर रिषभ पंतने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हातून बॅटही निसटली आणि हवेत उडाली, तसेच चेंडू स्क्वेअर-लेगला उडाला. त्यावेळी शशांक सिंगने सहज तो झेल घेतला.
त्यामुळे रिषभ पंतला १७ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. त्याच्या बाद होण्याने लखनौला चौथा धक्का बसला. त्याच्या विकेटनंतर संघमालक संजीव गोयंका अत्यंत निराश दिसले. त्यांची रिऍक्शन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान तो बाद झाल्यानंतर अब्दुल सामद आणि आयुष बडोनी यांनी झुंज दिली. अब्दुल सामदने २४ चेंडूत ४५ धावा केल्या, तर आयुषने ४० चेंडूत ७४ धावांची खेळी केली. पण त्यांना लखमौला विजयापर्यंत पोहचवता आले नाही. लखनौने २० षटकात ७ बाद १९९ धावाच केल्या.
तत्पुर्वी पंजाब किंग्सने २० षटकात ५ बाद २३६ धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ९१ धावा केल्या. तसेच कर्णधार श्रेयस अय्यरने ४५ धावा केल्या. जोश इंग्लिस (३०) आणि शशांक सिंग (३३*) यांनीही चांगल्या खेळी केल्या. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.