नवी दिल्ली : भात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा असणाऱ्या ताणसहनशील ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जातींचे प्रसारण केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आल्या. अवर्षणात पाण्याच्या ताणसहनशील आणि नत्र वापरायची उच्च कार्यक्षमता असलेल्या या दोन जातींची महाराष्ट्रासह चौदा राज्यांकरिता शिफारस करण्यात आली आहे.
एनएएससी कॉम्स्लेक्स येथील भारतरत्न सी. सुब्रह्मण्यम ऑडिटोरियम येथे रविवारी (ता.४) आयोजित एका विशेष कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री चौहान प्रमुख उपस्थित होते.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) या हवामान बदलाच्या आव्हानांना तोंड देणे आणि भात उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यासाठी या जाती विकसित केल्या आहे. मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या सांबा महसुरी (बीपीटी ५२०४) आणि एमटीयू १०१० (कोट्टोंडोरा सन्नालू) या दोन ताणसहनशील, उत्पादन आणि हवामान अनुकूल आणि मूळ क्षमता टिकवून ठेवणाऱ्या या वाणांपासून शास्त्रज्ञांनी ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जाती विकसित केल्या आहेत. दोन्ही जातींमध्ये दुष्काळात पाण्याच्या ताणासह सहनशील आणि नत्र वापरायची उच्च कार्यक्षमता आहे.
कृषिमंत्री चौहान म्हणाले, ‘‘प्रगत तंत्रज्ञानाचा शोध घेऊन शेती क्षेत्राचा विकास केल्याशिवाय भारत विकसित राष्ट्राचे ध्येय साध्य करू शकत नाही. नवे जनुकीय संपादित बियाणे हे भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी गरज अधोरेखित करतात. भारताचे कडधान्य आणि तेलबिया आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ‘आयसीएआर’च्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न वाढवावेत. ’’
चौहान म्हणाले, ‘‘देशाच्या अन्न सुरक्षेसाठी आणि भारताला ‘जगातील अन्नधान्य बास्केट’ बनविण्यासाठी संशोधक शास्त्रज्ञ महत्त्वाचे आहेत. सध्या भारत ४८ हजार कोटी रुपयांचा बासमती तांदूळ निर्यात करतो. तरीही, पौष्टिकतेने समृद्ध अन्न सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. ही जबाबदारी आपल्या कृषी शास्त्रज्ञांच्या खांद्यावर आहे.’’
कृषिमंत्र्यांचा नवा ‘फार्म्यूला’
या कार्यक्रमप्रसंगी कृषिमंत्री चौहान यांनी ‘वजा पाच, अधिक १०’ हे एक नवीन सूत्र सुचविले. ते म्हणाले, ‘‘भाताचे क्षेत्र ५० लाख हेक्टरने कमी करून उत्पादन एक कोटी टनांनी वाढवावे. हे कमी झालेले क्षेत्र कडधान्य आणि तेलबियांकडे उत्पादनाकडे वळवावे.’’
जातींचे वैशिष्ट्ये...
‘डीआरआर धान १०० (कमला)’ हे वाण आपल्या मूळ जातीच्या तुलनेत २० दिवस आधी (१३० दिवसांत) पक्वता गाठते. लवकर काढणीला येत असल्याने पुढील हंगामातील पिके साधता येणे शक्यता होते. तर ‘डीआरआर धान १०० (कमला)’ या वाणामुळे पिकाला देण्यासाठीचे किमान तीन सिंचन वाचते.
या राज्यांत होणार प्रसार
आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, पुद्दूचेरी, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल.
भाताच्या नव्या दोन्ही जातींमुळे उत्पादन २० ते ३० टक्क्यां-पर्यंत वाढेल. पाण्याची बचत होईल, भात लागवडीतून हरितवायू उत्सर्जन कमी होईल. या जातींची देशांत ५० लाख हेक्टरवर लागवड झाल्यास अतिरिक्त ४५ लाख टन उत्पादन होईल. या दोन्ही जाती लवकरच उपलब्ध करून दिल्या जातील.
- शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री