राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएल 2025 मधील 53 व्या सामन्यात अविस्मरणीय आणि स्फोटक खेळी करत सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले. मात्र रियानने हे 6 सिक्स एका ओव्हरमध्ये लगावले नाहीत. रियानने मोईन अली याच्या ओव्हरमधील शेवटच्या 5 चेंडूत सलग 5 षटकार लगावले. तर त्यानंतर रियानने मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याच्या ओव्हरमधील दुसऱ्याच बॉलवर सिक्स लगावला. रियानने अशाप्रकारे सलग 6 चेंडूत 6 षटकार पूर्ण केले.
रियानने राजस्थानच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील शेवटच्या 5 चेंडूंमध्ये सलग 5 लगावले. मोईन अली याने राजस्थानच्या डावातील 13 वी ओव्हर टाकली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती 14 वी ओव्हर टाकायला आला. शिमरॉन हेटमायर याने 14 व्या ओव्हरमधील पहिला चेंडू खेळला. शिमरॉनने पहिल्या बॉलवर 1 रन घेत रियानला स्ट्राईक दिली. रियानने या 14 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. रियानने अशाप्रकारे सलग 6 बॉलमध्ये 6 सिक्स पूर्ण केले. मात्र रियान एका ओव्हरमध्ये ही कामगिरी करु शकला नाही.
रियान परागची फटकेबाजी
रियानने या कामगिरीसह दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान पटकावलं आहे. रियानच्या आधी आयपीएलमध्ये एका ओव्हरमधील 5 चेंडूत 5 षटकार लगावण्याची कामगिरी 4 फलंदाजांनी केली आहे. या 4 फलंदाजांमध्ये ख्रिस गेल, राहुल तेवतिया, रवींद्र जडेजा आणि रिंकु सिंह यांचा समावेश आहे.