नाशिक- एमएचटी-सीईटी परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेत गणित विषयात तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. अशा राज्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल. सोमवारी (ता. ५) ही परीक्षा पार पडणार असल्याचे सीईटी सेलतर्फे कळविण्यात आले आहे.
एमएचटी-सीईटी परीक्षा संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) असल्याने सत्रनिहाय या परीक्षा पार पडल्या होत्या. पहिल्या टप्प्यात पीसीबी ग्रुपची परीक्षा झाली. त्यानंतर पीसीएम ग्रुपच्या परीक्षेचे आयोजन केले होते. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेच्या शेवटच्या दिवशी २७ एप्रिलला सकाळच्या सत्रातील परीक्षेत उमेदवारांना गणित विषयाशी संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या.
यासंदर्भात सीईटी सेलला ई-मेल, पत्राद्वारे पालक व विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदविल्या होत्या. त्यामुळे २७ एप्रिलला सकाळच्या सत्रात घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली. या दिवशी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा सोमवारी (ता. ५) घेतली जाणार आहे. सीईटी सेलतर्फे जारी केलेल्या यादीनुसार २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल.
ही परीक्षा पार झाल्यावर उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. त्यावर हरकती नोंदविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध केली जाईल. प्राप्त हरकतींचा निपटारा करीत अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. व त्यानंतर निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोगळा होणार आहे.