रत्नागिरी- किड्स सायक्लोथॉनमध्ये अवतरले बाल अंतराळवीर
esakal May 05, 2025 01:45 AM

61633
61634

किड्स सायक्लोथॉनमध्ये अवतरले बाल अंतराळवीर
रत्नागिरी सायकलिस्ट क्लब; ४०० हून अधिक सायकलिस्टचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे रविवारी येथे आयोजित पहिल्या किड्स सायक्लोथॉनमध्ये बाल अंतराळवीरांनी सायकल चालवली. विविध ग्रह, खगोलशास्त्रज्ञांचे फोटो व माहिती आणि प्रतिकृती सायकलवर साकारून, तसेच काहींनी चांद्रयानाची प्रतिकृतीसुद्धा सायकलवर लावली.
विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहण्याकरिता व शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीसाठी किड्स सायक्लोथॉनचे आयोजन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने केले. त्याकरिता सुवर्णसूर्य फाउंडेशनने छोटे अंतराळवीर चालवणार सायकल अशी संकल्पना मांडली. सायकलिस्टनी खगोलीय संकल्पना राबवल्या. दोन गटातील बालदोस्तांनी पाच व दहा किमी सायकल चालवली. उत्कृष्ट नियोजन, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, वाहतूक पोलिस आणि जिल्हा प्रशासन, पालकांचे सहकार्य यामुळे या उपक्रमाची चर्चा रंगली.
तारांगण येथे शनिवारी (ता. ३) गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभाग व खगोल अभ्यास केंद्राचे प्रा. बाबासाहेब सुतार यांनी टेलिस्कोपद्वारे चंद्र, ग्रह, ताऱ्यांची सैर घडवली. दरम्यान रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य मकरंद पटवर्धन यांना ''बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान'' रत्नागिरी सायकलिस्ट क्लब व सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात करण्यात आला.
तारांगण येथे ६ ते १० वयोगटासाठी पाच व ११ ते १५ वयोगटासाठी दहा किलोमीटरच्या सायक्लोथॉनमधील सायकलिस्टना हॉटेल विवेकचे विक्रांत देसाई, उद्योजक उदय लोध, हिंद सायकल्सचे मंगेश शिंदे, अजय पानगले यांच्या हस्ते झेंडा दाखवून सोडण्यात आले. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्वांनाच पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बालदोस्तांनी चिठ्ठ्यांमधून काढलेल्या भाग्यवान क्रमांकांना क्लबचे सक्रिय सदस्य योगेश मोरे यांच्यामार्फत बक्षीसे वितरित केली.
मार्गावर प्रत्येक ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, सुवर्णसूर्य फाउंडेशन व विविध सामाजिक कार्यकर्ते, वाहतूक पोलिस, पालक उपस्थित होते. चार ठिकाणी पाणी, गोळ्या अशा हायड्रेशनची व्यवस्था केली होती. सुरक्षेसाठी रुग्णवाहिका कार्यरत होती. हिरो सायकल्स, हिंद सायकल ट्रेडिंग कंपनी, सुरस स्नॅक्स, मनहा इंटरनॅशनल, हॉटेल विवेक, आनंदकल्प हॉस्पिटल, हॉटेल फ्लेवर्स आदींचे सहकार्य लाभले.
---------
कोट १
उत्तम नियोजन, शिस्तबद्ध कार्यक्रम, वेळेवर सुरवात, चविष्ट नाश्ता, थंडगार पेय आणि मनमुराद आनंदाने भरलेला दिवस. दिवसाची सुरवातच उत्साह व उत्सुकतेने भारावलेली होती. सर्व टीमचे धन्यवाद. असेच उपक्रम राबवा. पूर्ण रत्नागिरी उत्तम आरोग्याची होवो. देशाची भावी पिढी ताकदवान बनू दे.
- श्वेता सरपोतदार, रत्नागिरी.
----------
कोट २
रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच एवढ्या जास्त प्रमाणात मुलांनी सायकल चालवण्याचा आनंद घेतला. याचे श्रेय खऱ्या अर्थाने रत्नागिरी सायकलिस्ट क्लबला दिले पाहिजे. अशा सायक्लोथॉन आपण नेहमी आयोजित करावेत. यामुळे मुलांना हेल्दी राहण्याची तसेच सायकलिंग करण्याची प्रेरणा मिळेल.
- वर्षा माने, रत्नागिरी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.